‘लोकमत’चा दणका : झाले ते चुकीचेच, आता पुन्हा असे होणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 08:00 PM2019-02-27T20:00:57+5:302019-02-27T20:05:11+5:30

तेच तैलचित्र पुन्हा लावण्यात आले असल्याची अधिकृत माहिती संस्थेच्या वतीने कोषाध्यक्ष अरुण मेढेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

'Lokmat's Impact: It is wrong, it does not happen again | ‘लोकमत’चा दणका : झाले ते चुकीचेच, आता पुन्हा असे होणे नाही

‘लोकमत’चा दणका : झाले ते चुकीचेच, आता पुन्हा असे होणे नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे स.भु. संस्थेत गोविंदभार्इंचे तैलचित्र पुन्हा बसवले  स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते भडकले

औरंगाबाद : स.भु. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील बोर्ड रूममध्ये लावण्यात आलेले गोविंदभाई श्रॉफ यांचे तैलचित्र काढण्यात आले होते. जे झाले ते चुकीचे झाले. घाईगडबडीत हा निर्णय घेतला. आता पुन्हा अशी चूक होणार नाही. त्याठिकाणी तेच तैलचित्र पुन्हा लावण्यात आले असल्याची अधिकृत माहिती संस्थेच्या वतीने कोषाध्यक्ष अरुण मेढेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मराठवाड्याचे विकासमहर्षी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचे नेतृत्व आणि सक्रिय योगदानामुळे चळवळीचे केंद्र बनलेल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातून त्यांचे तैलचित्र हद्दपार केल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी उघडकीस आणला. यामुळे स्वातंत्र्यसैनिक, कार्यकर्त्यांमध्ये  खळबळ उडाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल तीव्र निषेध नोंदविण्यात आला. ‘लोकमत’चे वृत्तही सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. त्यावरही वादविवाद झाले.

तैलचित्र काढणे हा अवमान : स्वातंत्र्यसैनिक
स.भु. कार्यालयातून तैलचित्र काढल्याचे वृत्तपत्रातून समजले. धक्का बसला. गोविंदभार्इंना जाऊन १६ वर्षे झाली. गोविंदभार्इंच्याच हयातीत दिनकर बोरीकर, रमणभाई पारीख व ना.वि. देशपांडे यांनी भार्इंची संमती घेऊन तैलचित्र लावले होते. या संस्थेला १०३ वर्षे झाली. त्यात अनेक अध्यक्ष होऊन गेले आहेत; परंतु गोविंदभार्इंनी  या संस्थेसाठी सामाजिक दृृष्टिकोन स्वीकारला आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासााठी चळवळी चालवल्या. त्यामुळे ही संस्था मराठवाड्याचे प्रेरणास्थान म्हणून नावारूपाला आली. गोविंदभार्इंच्या कार्याची दखल घेऊन त्यांची स्मृती जपण्यासाठी गोविंदभाई श्रॉफ ललित अकॅडमी स्थापन केली. अशा थोर व्यक्तीचे तैलचित्र काढणे हा मी त्यांचा अवमान समजतो. आजपर्यंत त्या तैलचित्राला अभिवादन केले. तेथून ते काढणे योग्य नाही, अशा आशयाचे पत्र ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना.वि. देशपांडे, ताराबाई लड्डा, अ‍ॅड. काशीनाथ नावंदर आणि रामभाऊ फटांगळे यांनी संस्थाध्यक्ष राम भोगले यांना पाठविले आहे.

मराठवाड्यातील दोन कोटी जनतेचे प्रेरणास्थान
राज्यभर मानवी मूल्यांची, सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी मानणारी स.भु. आदर्श शिक्षण संस्था ही  गोविंदभाई यांच्या नावाशी जोडलेली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे सेनानी व या चळवळीला बौद्धिक योगदान देणारे आणि मागास मराठवाड्याच्या विकासासाठी  शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणारे गोविंदभाई होते. गोविंदभार्इंच्या नैतिकतेमुळे १९९४ मध्ये वैधानिक विकास महामंडळाची देशात पहिल्यांदा स्थापना होऊन मराठवाड्याचा आवाज ऐकला जाऊ लागला. निर्मोही, सैद्धांतिक भूमिकेचा आग्रह धरणारे तपस्वी मार्क्स व महात्मा गांधी यांच्या विचारांचा समन्वय साधणारे भाई हे शेकडो कार्यकर्त्यांची, शिक्षकांची प्रेरणा होते. ९१ वर्षांच्या आयुष्यातील ७० वर्षे राष्ट्र, समाज, शिक्षण, प्रौढशिक्षण, मराठवाड्याचा विकास, रचनात्मक कार्यासाठी व्रतस्थ वृत्तीने कार्य करणाऱ्या भार्इंचा इतिहास तरुणांपुढे आला पाहिजे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आले. हे सरस्वती कॉलनीतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, माजी व आजी विद्यार्थ्यांना स्फूर्तिदायक ठरणार नाही का? स.भु.मधील भार्इंची प्रतिमा ही केवळ एका व्यक्तीची प्रतिमा नसून एका आदर्श मूल्यांची प्रतिमा आहे. ती अनेक कार्यकर्त्यांची जीवन प्रेरणा आहे. मराठवाड्यातील दोन कोटी जनतेचे श्रद्धास्थान आहे. त्यांची प्रतिमा काढणे हे अविवेकी, वेदनादायी कृत्य आहे. आज प्रतिमा काढली. उद्या गोविंदभार्इंच्या स्मृतिस्थळावर हातोडा पडेल. आपल्या घरातील आजी-आजोबा, आई-वडिलांचे फोटो काढायचे नसतात, त्यांना वंदन करायचे असते.
-ज्ञानप्रकाश मोदाणी, सदस्य, स.भु. शिक्षण संस्था

गोविंदभाई यांच्यासारख्याचा फोटो कार्यालयातून काढला जातो. ही दुर्दैवी घटना आहे. गोविंदभाई ही काही व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी जीवन वाहून घेतलेली व्यक्ती आहे. फोटो काढणे म्हणजे विचाराला बाजूला करण्याचा प्रकार आहे. याची खंत वाटते. धक्का बसला. नवनियुक्त तरुण पदाधिकारी काही चांगले कार्य करतील, ही आशा होती. त्यांनी गोविंदभार्इंना बाजूला करण्याचाच प्रयत्न केला.
-सुभाष लोमटे, समाजवादी कार्यकर्ते

सरस्वती भुवनची प्रतिष्ठा व वाढ ही गोविंदभाई यांच्या काळातच झाली. त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे तैलचित्र काढणे हे चुकीचे आहे. 
-डॉ. भालचंद्र कांगो,              कम्युनिस्ट नेते

स.भु. संस्थेच्या कार्यालयातील गोविंदभाई यांचे तैलचित्र का काढले, हे माहीत नाही. कार्यकारिणीची बाजू समजून घेतल्याशिवाय कमेंट करणे योग्य नाही.
- भुजंगराव कुलकर्णी, माजी अध्यक्ष, स.भु. शिक्षण संस्था

स.भु. संस्थेच्या कार्यालयात घडलेला प्रकार एकाने फोनवरून सांगितला. तब्येत चांगली नसल्यामुळे घराबाहेर पडलेलो नाही. तरी त्यावर ‘नो कमेंट’ असे उत्तर आहे.
-न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, सदस्य, स.भु. शिक्षण संस्था

Web Title: 'Lokmat's Impact: It is wrong, it does not happen again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.