जलवाहिनींच्या क्रॉस कनेक्शनला मोठा विलंब; छत्रपती संभाजीनगरात आजही निर्जळी
By मुजीब देवणीकर | Published: February 15, 2024 11:40 AM2024-02-15T11:40:41+5:302024-02-15T11:41:08+5:30
यंदा उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली.
छत्रपती संभाजीनगर : मुबलक पाण्यासाठी टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीसाठी बुधवारी दिवसभर क्रॉस कनेक्शनचे काम सुरू होते. फारोळ्यातील काम नियोजित वेळेत पूर्ण झाले. जायकवाडीतील क्रॉस कनेक्शनचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे गुरुवारी शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेने शटडाउनमध्ये विविध कामे केली.
यंदा उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीची टेस्टिंग बाकी आहे. त्यापूर्वी जायकवाडी, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात क्रॉस कनेक्शनची कामे करणे आवश्यक होती. त्यासाठी बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शटडाउन घेण्यात आले. सिडको-हडकोसह शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने क्रॉस कनेक्शनची कामे हाती घेतली होती. दिवसभरात फारोळा येथील क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाले. जायकवाडी येथील कामाला रात्री १२ ते १ वाजण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मनपाने केली छोटी-मोठी कामे
सिडको-हडकोसाठी टाकलेल्या स्वतंत्र एक्स्प्रेस जलवाहिनीसाठी बीड बायपास रस्त्यावर दोन ठिकाणी क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात आले. फारोळा फाटा येथे १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील एक व्हॉल्व्ह खराब झाला होता, तो बदलण्यात आला. नक्षत्रवाडी येथील एमबीआरला गळती लागली होती, वेल्डिंग करून ही गळती बंद करण्यात आल्याची माहिती मनपाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली.
दुपारी पाणी येण्याची शक्यता
जायकवाडी ते नक्षत्रवाडी, तसेच नक्षत्रवाडी ते सिडको एन-५ पर्यंतची जलवाहिनी शटडाउनमुळे पूर्णपणे रिकामी करण्यात आली. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर अगोदर दोन्ही ठिकाणच्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने भरून घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतरच शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. रिकाम्या जलवाहिन्या पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागतो, त्यामुळे शहरात गुरुवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत पाणी येईल.
नागरिकांचे पाण्याविना हाल
बुधवारी घेतलेल्या शटडाउनची माहिती मनपाने काही तास अगोदर प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्यासाठी वेळच मिळाला नाही. बुधवारी दिवसभर पाण्याचा ठणठणाट सुरू होता. ज्या वसाहतींना पाणी मिळणार होते त्यांना गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारीच पाणी मिळेल. अगोदरच आठ ते दहा दिवसांनंतर अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होतोय. त्यात आणखी दोन दिवस वाढ हाेणार आहे.