मिरवणुकीवर ‘ड्रोन’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:56 AM2017-09-05T00:56:21+5:302017-09-05T00:56:21+5:30
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी शहर पोलीस सज्ज झाले असून, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पोलीस, एसआरपी जवान, होमगार्ड आणि एक हजार विशेष पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी तैनात केले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी शहर पोलीस सज्ज झाले असून, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पोलीस, एसआरपी जवान, होमगार्ड आणि एक हजार विशेष पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी तैनात केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून पोलीस मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत.
गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात म्हणाले की, मुख्य शहर, सिडको-हडको, मुकुंदवाडी, गारखेडा परिसर, सातारा परिसर आणि चिकलठाणा या वेगवेगळ्या विभागात स्वतंत्र विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. शहरातील संस्थान गणपती येथून निघणारी मिरवणूक ही मुख्य असते.
या मिरवणुका शांततेत पार पडाव्या यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, ४१ पोलीस निरीक्षक, ११८ पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, राज्य राखीव दलाची एक तुकडी, १८६५ पोलीस कर्मचारी, २०० महिला कॉन्स्टेबल, ४०० पुरुष आणि १०० महिला होमगार्ड यांच्यासह प्रथमच एनसीसी, एनएसएसचे जवान, एक हजार विशेष पोलीस अधिकारी यांची मदत घेतली जात आहे. यासोबतच दंगा काबू वज्र आणि वरुण वाहन, बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी केली जात आहे.
गर्दीच्या ठिकाणांवर साध्या वेशातील पोलीस अधिकारी कर्मचाºयांची गस्त सुरू आहे. संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.