खासगी वाहनांच्या भाडेवाढीवर ‘आरटीओ’च्या पथकाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 07:52 PM2018-04-30T19:52:03+5:302018-04-30T19:53:08+5:30

सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते.

Look at the RTO's team on the fare of private vehicles | खासगी वाहनांच्या भाडेवाढीवर ‘आरटीओ’च्या पथकाची करडी नजर

खासगी वाहनांच्या भाडेवाढीवर ‘आरटीओ’च्या पथकाची करडी नजर

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादेतून दररोज विविध मार्गांवर १२५ खाजगी बस धावतात. उन्हाळी, दिवाळी सुट्यांत खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडे आकारणीला प्रवाशांना सामोरे जावे लागते.

औरंगाबाद : सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. परंतु आता खासगी वाहनांना एस. टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेता येणार आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवली जात आहे. 

औरंगाबादेतून दररोज विविध मार्गांवर १२५ खाजगी बस धावतात. उन्हाळी, दिवाळी सुट्यांत खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडे आकारणीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. यंदाच्या उन्हाळ्यात हा आर्थिक फटका बसणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एस. टी. बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येतात. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि. मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एस. टी. महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय २७ एप्रिल रोजी घेण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येत असल्यास मोटार वाहन कायदा नियमाप्रमाणे संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयाचे खाजगी वाहतूकदारांनी स्वागत केले. परंतु काही बाबी स्पष्ट नसल्याने संभ्रम असल्याचे म्हणणे आहे.

‘एस.टी.’ चे काही दर
- औरंगाबाद - पुणे मार्गावर साध्या बसचे (लाल बस) २४२, शिवशाही बसचे ३७६, एशियाड बसचे ३४१ तर शिवनेरी बसचे ६५६ रुपये भाडे आहे. औरंगाबाद- नाशिक मार्गावर शिवशाही बसचे ३१९, साध्या बसचे २१५, एशियाड बसचे २९२ तिकीट दर आहे. 
- औरंगाबाद- नागपूर शिवशाही बसचे ८०८ तर साध्या बसचे ५६७ रुपये भाडे आहे, अशी माहिती एस. टी. महामंडळ्याच्या सूत्रांनी दिली.

खाजगी वाहन चालकांनो सावधान
एस. टी. महामंडळाच्या भाडेदरापेक्षा दीडपटपेक्षा अधिक भाडे घेणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. कोणी जर अधिक भाडे आकारत असेल तर त्यासंदर्भात प्रवाशांना आरटीओ कार्यालयात तक्रार करता येईल. 
- संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

अधिक पारदर्शकता हवी
अनेक खाजगी बसचे दर हे ‘एस.टी.’पेक्षा कमी आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे अतिरिक्त बसेस सोडाव्या लागतात. एकेरी मार्गावरच गर्दी असते तेव्हा भाडेवाढ होते. परिस्थितीचा कोणीही गैरफायदा घेता कामा नये. परंतु एस. टी. आणि खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये मोठा फरक आहे. जो निर्णय घेण्यात आला आहे, तो अधिक पारदर्शक केला पाहिजे.
- राजन हौजवाला, अध्यक्ष, औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन
 

Web Title: Look at the RTO's team on the fare of private vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.