मान खाली घालून मोबाइल पाहता? मग मणका गेलाच समजा; तरूणांवर शस्त्रक्रियेची नामुष्की

By संतोष हिरेमठ | Published: October 16, 2024 02:49 PM2024-10-16T14:49:52+5:302024-10-16T14:50:55+5:30

‘बुलेटराजा’लाही कंबरदुखी, सतत संगणकावर कामाने मणक्यावर होतोय विपरीत परिणाम

Looking at your mobile with your neck down? Then suppose the spine is gone; Surgery on the young is a shame | मान खाली घालून मोबाइल पाहता? मग मणका गेलाच समजा; तरूणांवर शस्त्रक्रियेची नामुष्की

मान खाली घालून मोबाइल पाहता? मग मणका गेलाच समजा; तरूणांवर शस्त्रक्रियेची नामुष्की

छत्रपती संभाजीनगर : हल्ली मान पुढे वाकून अनेकांच्या हाताची बोटे तासनतास मोबाइलवर फिरत असतात. त्यात काही जण मोबाइल पाहण्यासाठी उंच व जाड उशीचा वापर करतात. यातूनच मानेच्या मणक्यांची झीज होऊन त्यातील अंतर कमी होते आणि मज्जारजूची नस दबते. मोबाइलसह संगणक, लॅपटाॅपचा अतिवापर, बुलेटसारख्या अवजड वाहनांच्या वापराने तरुणांमध्ये कंबरदुखी, मणकेदुखी वाढत आहे. त्यात अनेकांवर शस्त्रक्रियेचीही नामुष्की ओढावत आहे.

दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी ‘वर्ल्ड स्पाइन डे’ साजरा केला जातो. तंत्रज्ञानाच्या युगात बैठे काम वाढले आहे. तासनतास एकाच ठिकाणी बसून काम केल्यानेच मान व कंबरदुखीचा आजार वाढतच चालला आहे. खराब रस्त्यावरून वारंवार प्रवास करणारे व्यक्ती, ट्रॅक्टर चालवणारे चालक, ‘वर्क फाॅर्म होम’ करणारे इंजिनिअर्समध्येही कंबर व मानदुखीचा त्रास जास्त आहे. सर्व्हायकल स्पाँडिलिसिस विथ रेडिक्युलोपॅथीया आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

वर्षभरात २०० स्पाइन सर्जरी
वर्षभरात २०० स्पाइन सर्जरी केल्या आहेत. तर ओपीडीमध्ये १० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार, शस्त्रक्रिया केल्या जातात. अचानक जड वस्तू उचलण्यामुळे कंबर दुखणे, पाठीत लचक बसणे, पायात मुंग्या येणे, लघवीवरील नियंत्रण जाणे आदी उद्भवू शकतात.
- डाॅ. अनिल धुळे, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, घाटी

शस्त्रक्रियांमध्ये तरुणांचे प्रमाण ४० टक्के
काम करताना सतत एकाच ठिकाणी बसून न राहता दर अर्ध्या तासाला मानेची व कंबरेची स्ट्रेचिंग केली पाहिजे. तसेच सकाळी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. खूप दिवसांपासून मानदुखी किंवा कंबरदुखी असेल तर अस्थिरोगतज्ज्ञ किंवा स्पाइन स्पेशलिस्ट यांना दाखवणे गरजेचे आहे. बऱ्याच मणक्याच्या आजारांचे निदान वेळेस झाल्यास अपंगत्व येण्यापासून टाळता येते. वर्षभरात केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये तरुण रुग्णांचे प्रमाण जवळपास ४० टक्के आहे.
- डॉ. चंद्रशेखर गायके, अस्थिरोगतज्ज्ञ व एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन

नियमित व्यायाम, आहार महत्त्वाचा
तरुण वयात पुरुषामधे अवजड दुचाकी वाहन, जसे जसे बुलेटचा वापर खूप प्रमाणात होत असल्याने कमरेच्या मणक्यांची झीज होत आहे. गरजेपेक्षा जड वस्तू उचलून व्यायाम करण्यामुळेही मणक्यांची झीज होण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय सर्व वयोगटात व्यायाम न करणे व कॅल्शियममुक्त आहार वाढल्याने हाडांचा ठिसूळपणा वाढत आहे. या सर्व गोष्टींसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आहार घेणे आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी उन्हात बसणे आवश्यक आहे.
- डाॅ. मुक्तदीर अन्सारी, उपअधिष्ठाता तथा अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, घाटी

Web Title: Looking at your mobile with your neck down? Then suppose the spine is gone; Surgery on the young is a shame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.