ढिसाळ नियोजन; शेतकरी त्रस्त
By Admin | Published: May 17, 2017 12:04 AM2017-05-17T00:04:32+5:302017-05-17T00:06:38+5:30
लातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे.
राजकुमार जोंधळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे. परिणामी, पुन्हा शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु केले आहेत. मात्र, केंद्रावरील ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लातूरच्या गुळ मार्केट परिसरात तूर घेऊन आलेल्या काही वाहनांतील तूर अद्याप उतरवून घेण्यात आली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना वाहन भाड्यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर काही शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून खरेदी केंद्रावर मुक्काम ठोकला आहे.
गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तूर उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. परिणामी, बाजार समितीत तुरीची अपेक्षेपेक्षा अधिक आवक झाल्याने अचानक दर कोसळले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र जिल्हाभरात सुरु केले. या केंद्रावर आतापर्यंत जवळपास २ लाख ४९ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्राची मुदत संपल्याने ती बंद करण्यात आली. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची ‘तूर’कोंडी झाली. पुन्हा हे केंद्र सुरु करुन, उर्वरित शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत होती.
अखेर सोमवारी आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी तूर खरेदी केंदे्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यातील उदगीर, देवणी, जळकोट आणि निलंगा येथे हे खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.