परतीच्या प्रवासात प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:03 PM2018-11-11T21:03:52+5:302018-11-11T21:05:10+5:30
औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् परतीचा प्रवास करणाऱ्यांची ‘एसटी’सह खाजगी बसेसना रविवारी एकच गर्दी झाली. दिवाळी हंगामातील अखेरच्या टप्प्यातील गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशा: लूट केली. मुंबईसाठी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात आले.
अव्वाच्या सव्वा भाडे : खाजगी वाहतूकदारांची मनमानी, औरंगाबाद-मुंबई भाडे २ हजारांवर
औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् परतीचा प्रवास करणाऱ्यांची ‘एसटी’सह खाजगी बसेसना रविवारी एकच गर्दी झाली. दिवाळी हंगामातील अखेरच्या टप्प्यातील गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशा: लूट केली. मुंबईसाठी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात आले.
औरंगाबादहून विविध शहरांना जाण्यासाठी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात रविवारी प्रवाशांची गर्दी झाली. मध्यवर्ती बसस्थानकात शिवनेरी, एशियाड बसेसचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी होती. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहून तिकीट घेण्याची वेळ प्रवाशांवर आली. नोकरी, शिक्षणानिमित्त शहरातून पुण्याला वास्तवास असलेल्यांची मोठी संख्या आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी हे सर्व शहरात आले होते. दिवाळीच्या सुट्या संपताच अशांनी रविवारी आपापल्या नोकरी, कामाच्या आणि शिक्षणाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात एकच गर्दी केली. प्रवाशांच्या गर्दीमुळे बसेस वेळेवर जातील,यासाठी अधिकारी बसस्थानकात तळ ठोकून होते.
बसच्या प्रतिक्षेत प्रवाशांना वाट पहावी लागत होती. प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. प्रवाशांच्या गर्दीपुढे बस कमी पडत होत्या. त्यामुळे ऐनवेळी बसगाड्यांची जुळवाजुळव करण्याची वेळ अधिकारी-कर्मचाºयांवर आली. इतर मार्गावरील बसगाड्यांनाही मोठी गर्दी पहायला मिळाली. रेल्वेस्टेशनवरही प्रवाशांची चांगलीच गर्दी झाली होती.
दिवाळीच्या तोंडावर खाजगी बसच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. एस. टी. महामंडळाच्या भाडेदरापेक्षा दीडपट भाडे घेता येतात. त्यादृष्टीने वाढ करण्यात आली. मात्र दिवाळीनंतर खाजगी बसने प्रवास करणाºयांकडून मनमानी पद्धतीने दुप्पट, तिप्पट भाडे आकारण्यात येत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली.
कारवाईकडे दुर्लक्ष
अधिक भाडे आकारणाºया खाजगी ट्रॅव्हल्सवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवण्यात आली. प्रारंभी काही बसेसवर कारवाई करण्यात आली. परंतु त्यानंतर खाजगी वाहतूकदारांवर कृपादृष्टी दाखविण्यात आली,अशी ओरड प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
असोसिएशनच्या नियंत्रणाबाहेर
गर्दीचे दिवस म्हणून भाडे वाढविले जातात. काहींनी अधिक भाडे केले हे खरे आहे. परंतु मुंबई येथील काही बसमालकांनी अशाप्रकारे दर वाढविलेले आहे. त्या बसेस मूळ मुंबईच्या आहेत. त्यामुळे त्यावर आमच्या असोशिएशनचे नियंत्रण नाही.
-राजन हौजवाला, अध्यक्ष, औरंगाबाद बस ओनर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन