छत्रपती संभाजीनगरात दीड तासात जालना रोडवर दोघांना लुटले, पोलिस निष्प्रभ का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:15 IST2025-04-05T16:13:40+5:302025-04-05T16:15:39+5:30
छत्रपती संभाजीनगरात रात्रभर गुन्हेगारांचा राजरोस वावर, पोलिस निष्प्रभ

छत्रपती संभाजीनगरात दीड तासात जालना रोडवर दोघांना लुटले, पोलिस निष्प्रभ का?
छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षभरापासून शहरातील लूटमारीचे सत्र थोपविण्यात शहर तसेच जिल्हा पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. गुरुवारी पहाटे ४ ते ५.३० या दीड तासात ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी दोघांना लुटले. यात लातूरहून आई-वडिलांनी पाठवलेला डबा घेण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून ऑनलाइन पैसे घेत मोबाइल लंपास केला.
औसा तालुक्यातील असलेला फरानसैफ अक्रम खान (१७, रा. ह. मु. एन-६) हा एमजीएम महाविद्यालयात शिकतो. आई-वडिलांनी बुधवारी रात्री त्याला एका ट्रॅव्हल्सद्वारे खाद्यपदार्थांचा डबा पाठवला होता. तो घेण्यासाठी पहाटे ४ वाजता फरानसैफ सेव्हन हिलच्या एका संगणकाच्या दुकानासमोर बसची वाट पाहत होता. त्यावेळी तोंड बांधलेले ट्रिपलसीट दुचाकीस्वर त्याच्याजवळ गेले. पैशांची मागणी करून मारहाण करत त्याला पायऱ्यांवर बसवले. बळजबरीने ५०० रुपये, मोबाइल काढून घेतला. मोबाइल पासवर्डसाठी धमकावून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करून घेत मोबाइल, रोख रकमेसह पोबारा केला. या घटनेमुळे फरानसैफ घाबरला. रात्री वडील शहरात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दिली.
दीड तासांनी हायकोर्टासमोर लुटले
सुमित आव्हाड (१९, रा. न्यायनगर) हा तरुण गुरुवारी पहाटे ५.३० वाजता हायकोर्ट परिसरात मॉर्निंग वॉक करत होता. फरानसैफला लुटलेल्या दुचाकीस्वारांनीच त्यालाही अडवून धमकावत खिशातील मोबाइल हिसकावला. तिसऱ्या घटनेत अमित गव्हाळे (२९) यांना दि. ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता कांचनवाडीत अज्ञात तिघांनी नाहक मारहाण करून डोक्यात दगड घातला.
पोलिस निष्प्रभ का? -गेल्या वर्षभरापासून शहरात सातत्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिलांना लुटले जात आहे.
-सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्यांसह तोतया पोलिसांचा राजरोस शहरात वावर वाढला आहे.
-मात्र, शहर, जिल्हा पोलिस निष्प्रभ झाल्याने गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढला. पोलिस ठाण्यांमधील डीबी पथक, गुन्हे शाखेच्या पथकांचा ‘अर्थपूर्ण’ कारवायांतच अधिक रस वाढल्याने त्यांना मूळ कामाचाच विसर पडलाय.