लॉकडाऊनच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:39+5:302021-05-05T04:06:39+5:30
लाडसावंगी : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी शेतात पाइपलाइन ठिबक सिंचन आदी कामे करीत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या नावाखाली पाइपचे ...
लाडसावंगी : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी शेतात पाइपलाइन ठिबक सिंचन आदी कामे करीत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या नावाखाली पाइपचे दुप्पट भाव वसूल करत असल्याने शेतकऱ्याची आर्थिक लूट दुकानदारांकडून केली जात असल्याचे समोर आले आहे.
जूनपासून खरीप हंगामाला सुरुवात होते. तत्पूर्वी शेतकऱ्यांकडून शेतीमशागतीला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, पावसाचा अंदाज लक्षात घेत, शेतामध्ये ठिबक सिंचन महत्त्वाचा आहे. शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी पाइपलाइन करून, ठिबक करणे आदी कामे सुरू झाली आहेत. त्यासाठी शेतकरी पाइपसह अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गेले असता, त्यांना लॉकडाऊनमुळे चांगलाच भुर्दंड बसला आहे. शेतीसंबंधी दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात आता वाढ केली असून, सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने खुली राहणार आहेत. असे असले, तरी लॉकडाऊन असल्याने माल संपला आहे. असे सांगून दुकानदार मंडळी दुप्पट किमतीने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करून लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला जात आहे, तर अनेक शेतकरी पाइपलाइनचे कामे करीत आहेत.
पाइपचे जुने दर
दोन इंची : २८० रुपये
अडीच इंची : ४१० रुपये
तिन इंची : ५९० रुपये.
नवीन दर आकारणी
दोन इंची : ५२० रुपये
अडीच इंची : ७२० रुपये
तीन इंची : १,०५० रुपये.
बिल मागितल्यास साहित्य संपले
कोरोना महामारीमुळे सध्या सातत्याने शासनाकडून निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे कृषी विभाग अथवा संबंधित अधिकारी शहराबाहेर पडत नाही. त्यामुळे दुकानदारांवर कोणाचेही बंधन राहिले नाही. याच संधीचा फायदा घेत, दुकानदार दुप्पट किंवा तिप्पट किंमत लावून पाइपसह अन्य शेतीपयोगी साहित्य विक्री करीत आहेत. एखाद्या शेतकऱ्याने बिल मागितले तर आमच्याकडे साहित्य नाही, असे सांगून दुकानदार नामानिराळे होत आहेत.
नवीन विहिरीवरून सहाशे फूट लांब शेतात पाणी नेण्यासाठी तीस पाइपांची गरज होती, शिवाय पाइपलाइन न केल्यास एवढ्या दूर व चढावर पाणी जात नसल्याने, एक पाइप वीस फुटांचा व अडीच इंची ७२० रुपये प्रती नगाने मिळाला.
- राज सातभाये, शेतकरी, लाडसावंगी
मला एक हजार फुटांवर जवळपास पन्नास पाइप टाकायचे होते, परंतु पाइपाचे दर अवाक्याबाहेर असल्यामुळे मी यंदा पाइपलाइन करणे टाळले.
- प्रताप बैनाडे, भोगलवाडी