रोजगार देण्याच्या बहाण्याने बोगस संस्थेकडून बेरोजगारांचीच लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:04 AM2021-07-08T04:04:27+5:302021-07-08T04:04:27+5:30
बापू सोळुंके औरंगाबाद : ‘महाराष्ट्र ग्रामीण ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट’ या तथाकथित संस्थेने औरंगाबादेतील शेकडो तरुणांना दिल्लीतील एका डिजिटल कंपनीच्या ...
बापू सोळुंके
औरंगाबाद : ‘महाराष्ट्र ग्रामीण ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट’ या तथाकथित संस्थेने औरंगाबादेतील शेकडो तरुणांना दिल्लीतील एका डिजिटल कंपनीच्या नावाने टपालामार्फत कॉल लेटर पाठवून फसवले आहे. ही मुलाखत पत्रे घेण्यासाठी तरुणांना प्रत्येकी ५९९ रुपये भरावे लागले. डाटा एन्ट्रीचे काम मिळविण्यासाठी ९ हजार ५०० रुपये कंपनीकडे डिपॉझिट भरण्याची अट त्यात आहे. यातून हजारो बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे घाटत आहे.
शासकीय कॉल लेटर समजून अनेकांनी पैसे भरून ते घेतले, तर काहींनी पैसे न भरता त्यांना आलेले कॉल परत पाठविले. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. यामुळे लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. दररोज बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. या भीषण परिस्थितीत बेरोजगारांना काम देण्याच्या बहाण्याने त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले. शहरातील शेकडो तरुणांच्या पत्त्यावर कॉल लेटर पाठवून त्यांना नोकरीच्या मुलाखतीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शासकीय कार्यालयाच्या टपालासारखे हे कॉल लेटर दिसते. शासकीय कॉल लेटर समजून ५९९ रुपये जमा करून कॉल लेटर घ्यावे लागते. कॉल लेटरच्या बंद लिफाफ्यातील नोकरीची माहिती वाचून मात्र आश्चर्याचा धक्का बसतो.
-----------------
चौकट
अभियंता तरुणाने ओळखले कंपनीचे षड्यंत्र
जवाहर कॉलनी परिसरातील रहिवासी राजीव पाटील या अभियंता तरुणाला नुकतेच एक कॉल लेटर प्राप्त झाले. त्यांच्या मुलाखतीसाठी २६ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली. ही मुलाखत कशी होणार, याविषयी मात्र कोणताही उल्लेख नाही. अर्ज न करता कंपनीने परस्पर कॉल लेटर पाठविल्याचे पाहून पाटील यांना कंपनीविषयी शंका आली. बेरोजगार तरुणांची माहिती मिळवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे कंपनीचे हे षड्यंत्र असल्याचे त्यांनी ओळखले. पाटील यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
----------------
चौकट
९ हजार ५०० रुपये सुरक्षा रक्कम भरण्याची अट
५९९ रुपये भरून कॉल लेटर घेतलेल्या तरुणांना नोकरीसाठी अनेक अटी घातल्या आहेत. या अटींनुसार कंपनीकडे ९ हजार ५०० रुपये सुरक्षा रक्कम भरणे बंधनकारक आहे. एक वर्षानंतर ही रक्कम परत करण्याचा दावा कंपनीचा आहे. त्यांना एक ते दोन तास काम केल्यावर ५०० रुपये अथवा दरमहा १२ हजार ते २० हजार रुपये देण्याचे आमिष कंपनीने दाखविले. उमेदवाराला दिलेले कामाचे लक्ष्य ९० टक्केपर्यंत अचूकपणे आणि वेळेत गाठल्यास उमेदवाराला १०० टक्के मोबदला दिला जाईल, तर ५० टक्केपेक्षा कमी काम झाले, तर वेतन मिळणार नाही, असेही स्पष्ट केले.
-----------------
पार्टटाइम कामाच्या नावाखाली फसवणुकीच्या तक्रारी सायबर पोलिसांना प्राप्त होत आहेत. पार्टटाइम काम करा आणि घरबसल्या चांगली कमाई करा, असे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविणारे लोक सध्या सक्रिय असल्याचे सायबर ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.