भगवान बुद्धांची करुणा, मैत्री हीच सर्वांना प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:28 AM2017-10-30T01:28:24+5:302017-10-30T01:28:39+5:30
बीड बायपास रोडलगत जबिंदा लॉन्सवर आयोजित दुस-या इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा, मैत्री आणि शांतीचा संदेश हाच भारतासह सर्व आशिया खंडातील राष्ट्रांसाठी प्रेरणादायी आहे. बुद्धांचा याच विचारांचा धागा भारताला सर्व बौद्ध राष्ट्रांसोबत जोडणारा आहे. आम्ही श्रीलंकन असलो, तरी बुद्धांची भूमी असलेला भारत देश हीच आमची मातृभूमी असल्याची भावना श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्ष यांनी आज व्यक्त केली.
बीड बायपास रोडलगत जबिंदा लॉन्सवर आयोजित दुस-या इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री प्रा. जी. एल. पॅरिस, खा. लोहान रतवत्ते, खा. उदित लोकुबंडारा, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अमर साबळे, अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले होते.
माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीमध्ये केली. त्यानंतर इंग्रजीमध्ये त्यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल गौरपूर्ण विवेचन केले. भारताची राजमुद्रा तसेच राष्ट्रध्वजावर बौद्ध प्रतीकांचा समावेश आहे. श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र म्हणून गणले जात असले, तरी तेथील संविधानाने त्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे श्रीलंकेमध्ये आज अल्पसंख्याक असलेला संप्रदाय सातत्याने बौद्ध राष्ट्र संबोधण्यास विरोध करीत आहे. परंतु बुद्धांचा विचार हा मैत्री, करुणा, शांतीचा आहे. त्यामुळे श्रीलंकेमध्ये सर्व धर्म- संप्रदायाचे लोक एकोप्याने राहतात. या देशात बुद्धांचा जन्म झाला. परंतु भारतात बुद्धाच्या धम्माला फारसे संरक्षण मिळू शकले नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा या फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक भन्ते एम. धम्मज्योती थेरो यांनी केले. स्वागताध्यक्ष विजय मगरे, मनीष बागूल, प्रफुल्ल ढेपे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर, खा. साबळे, पर्यटनमंत्री रावले, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मनोगत व्यक्त केले.