देखाव्यासाठी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीताच्या पोशाखांना प्रचंड मागणी, धनुष्यबाण दिल्लीहून मागवले
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 22, 2024 12:49 PM2024-01-22T12:49:44+5:302024-01-22T12:50:29+5:30
भाड्याने पोशाख देणाऱ्यांच्या दुकानावर यासाठी झुंबड उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त शहरातही ३५० पेक्षा अधिक मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय कॉलनीत, सोसायटीतही कार्यक्रम घेण्यात येत आहे. यानिमित्त प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीताच्या पोशाखांना प्रचंड मागणी असून, पुढील दोन दिवसांचे ३५० पेक्षा अधिक पोशाखांची बुकिंग झाली आहे.
सजीव देखाव्यासाठी पोशाख भाड्याने
प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानरायाच्या सजीव देखाव्यासाठी पोशाख भाड्याने घेतले जात आहे. भाड्याने पोशाख देणाऱ्यांच्या दुकानावर यासाठी झुंबड उडाली आहे. सर्व पोशाख बुक झाल्याने अनेकजण पोशाख अर्जंटमध्ये शिवून घेत आहेत. यामुळे टेलर रात्री उशिरापर्यंत जागून हे पोशाख शिवत आहे.
भगवंतांच्या पोशाखाचे काय भाडे?
भगवंतांचे पोशाख अवघ्या एक महिन्याच्या बाळापासून ते १८ वर्षांच्या तरुणांपर्यंत मिळत आहे. यासाठी ३०० ते तीन हजार रुपयांपर्यंत दिवसभराचे भाडे आकारले जात आहे.
धनुष्यबाण दिल्लीहून मागविले
भाड्याने पोशाख देणाऱ्यांकडे धनुष्यबाण कमी असल्याने अखेर त्यांनी दिल्लीहून अर्जंटमध्ये धनुष्यबाण मागवून घेतले आहेत.
प्रभू श्रीरामाच्या बालरूपातील पोशाख
प्रभू श्रीरामाच्या बालरूपात लहान मुलांचे फोटो काढून घेतले जात आहेत. यासाठी पोशाख भाड्याने नेले जात आहे. तसेच त्यासोबत हलव्याचे दागिनेही भाड्याने दिले जात आहे. मागील आठवडाभरापासून या पोशाखांना घरगुती मागणी वाढली आहे. आता अशी परिस्थिती आहे की, भगवंतांचे सर्व पोशाख बुक झाले आहेत.
-नीलेश मालानी, व्यापारी