राजकीय इच्छाशक्ती अभावी ४ एमएलडी पाण्यास मुकलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:01 PM2019-03-31T16:01:17+5:302019-03-31T16:02:11+5:30

तीन एमएलडी टँकरसाठी : एमआयडीसी पाणी देण्यास तयार; पण...

loss of 4 MLD water due to Lack of political will | राजकीय इच्छाशक्ती अभावी ४ एमएलडी पाण्यास मुकलो

राजकीय इच्छाशक्ती अभावी ४ एमएलडी पाण्यास मुकलो

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील २०० पेक्षा अधिक वसाहतींची तहान महापालिकेला टँकरद्वारे भागवावी लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला ३ एमएलडी पाण्याची गरज दररोज भासते. एमआयडीसी प्रशासन सिडको एन-१ भागातील पाणीपुरवठा केंद्रातून ४ एमएलडी पाणी महापालिकेला देण्यास तयार आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी मागील वर्षीपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. शहरात पाणी वाढावे यादृष्टीने राजकीय नेतृत्व अजिबात प्रयत्न करायला तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

जायकवाडी धरणाची पाणीपातळी खालावल्याने शहरात अगोदरच २० टक्के पाणी दररोज कमी प्रमाणात येत आहे. शहराबाहेर नवीन २०० वसाहती आहेत. त्यांना महापालिकेच्या ९४ टँकरद्वारे दिवसभरातून ६०० फेऱ्या कराव्या लागतात. त्यातील १०० टँकर आजही मोफत दिले जातात. सर्वाधिक टँकर एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर भरण्यात येतात. ४३ टँकर येथे २०० पेक्षा अधिक फेऱ्या करतात. एन-७ येथील पाण्याच्या टाकीवरूनही ३६ टँकर भरण्यात येतात. दोन्ही टाक्यांवरून किमान ३ एमएलडी पाणी लागते. साधारणपणे ३० लाख लिटर पाणी दररोज टँकरला द्यावे लागते. एवढ्या पाण्यात शहरातील किमान १० वॉर्डांची तहान भागविता येते. या दोन्ही पाण्याच्या टाक्यांवर २४ तासांत किमान ३० एमएलडी पाणी येणे अपेक्षित आहे. मागील काही दिवसांपासून १५ ते १८ एमएलडी पाणी येत असल्याने सिडको-हडकोत पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

सिडको एन-१ भागात एमआयडीसीचे पाणीपुरवठा केंद्र आहे. येथून दररोज ४ एमएलडी पाणी टँकरसाठी मिळाल्यास महापालिकेला मोठा आधार होईल. मागील वर्षी ऐन उन्हाळ्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी घेणार अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार आजपर्यंत कोणतीच अंमलबजावणी करण्यात आली नाही. यंदा उन्हाळ्यात पुन्हा पाणी प्रश्न गंभीर झाल्यावर महापालिकेला एमआयडीसीची आठवण झाली आहे. मनपा प्रशासनाने लेखी प्रस्ताव सादर केल्यास तो मुंंबईला पाठवून त्वरित मंजुरी घेण्यात येईल, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे खाजगीत म्हणणे आहे. मनपा प्रशासनाने आजपर्यंत प्रस्तावच तयार केलेला नाही. 

उद्योगमंत्री सेनेचेच
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अखत्यारीत एमआयडीसी आहे. महापालिकेतही सेनेचीच सत्ता आहे. उद्योगमंत्र्यांकडून मंजुरी आणणे सेनेला सहज शक्य आहे. महापालिकेतील सेना-भाजप युतीच्या नेत्यांनी प्रभावी इच्छाशक्तीचा वापर केल्यास शहरात ४ एमएलडी पाणी आणणे अशक्यप्राय नाही. 

पाणीपुरवठ्याच्या २४२ तक्रारी; सोडविल्या फक्त २०
पाणीपुरवठ्यासंदर्भात नागरिकांना तक्रार करण्यासाठी मनपा आयुक्तांनी एक स्वतंत्र वॉर रूमची जानेवारी महिन्यात स्थापना केली. मागील अडीच महिन्यात या वॉर रूमकडे नागरिकांनी तब्बल २४२ तक्रारी केल्या. मनपा प्रशासनाने त्यातील फक्त २० तक्रारी सोडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी वॉर रूमकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. 

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींचा तर पाऊसच पडत आहे. पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी सोडविण्यासाठी आयुक्तांनी जानेवारीत वॉर रूमची स्थापना केली. नागरिकांना टोल फ्री क्रमांक देण्यात आला. याठिकाणी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते २४ तास ते उपलब्ध आहेत. वॉर रूममध्ये तक्रार नोंदविल्यानंतर ती पाणीपुरवठा विभागाकडे त्वरित वर्ग करण्यात येते. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन काम करणे मनपा प्रशासनाला अपेक्षित आहे.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात वॉर रूममध्ये २४२ तक्रारी प्राप्त झाल्या. फक्त २० तक्रारी सोडविण्यात आल्या. च्वॉर रूमकडे तक्रार नोंदवूनदेखील प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी थेट आयुक्तांकडेच तक्रारी करणे सुरू केले आहे. आयुक्तांनी याबाबतचा अहवाल मागविला आहे. वॉर रूममध्ये दाखल तक्रारींमध्ये दूषित पाण्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यापाठोपाठ पाईपलाईन फुटणे, नळाला कमी दाबाने पाणी येणे, अनियमित पाणीपुरवठा, अशा तक्रारी आहेत.

Web Title: loss of 4 MLD water due to Lack of political will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.