परतीच्या पावसाने मराठवाड्यातील ३० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:24 PM2019-11-02T13:24:41+5:302019-11-02T13:33:55+5:30
७० टक्क्यांवर शेतीला ओल्या दुष्काळाचा फटका
औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे ३० लाख हेक्टरवरील पिकांचे आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिला. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाड्यात परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीचा आढावा प्रशासनाकडून घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जिल्हानिहाय पिकांच्या नुकसानीची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शासनाला दिली.
प्राथमिक अहवालानुसार विभागात एकूण ५२ लाख ६५ हजार १६५.९६ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यातील ४८ लाख ७० हजार १९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विभागातील ८ हजार ५१४ पैकी ८,४५० गावांना आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. ४३ लाख १ हजार ४३६ पैकी ३० लाख २५ हजार ७६२ शेतकरी बाधित झाले आहेत. जिरायती आणि बागायती मिळून सुमारे २९ लाख ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे. सोयाबीनचे १२ लाख २८ हजार ९४० हेक्टर, कापसाचे ११ लाख ४४ हजार ५२९ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. इतर खरीप हंगामातील ५ लाख ८४ हजार १३१ हेक्टवरील पिके वाया गेली आहेत. ७० टक्के नुकसान झाल्याची प्राथमिक टक्केवारी समोर आली आहे.
मराठवाड्यात दोन तालुक्यांत कोरडा दुष्काळ
मराठवाड्यात अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात दुष्काळ असल्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. अंबाजोगाईत गंभीर तर परांडा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ७० टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला असताना त्या तालुक्याचा समावेश दुष्काळात केला गेला नाही.
३ ते ४ दिवसांत पंचनामे पूर्ण करा
ऑक्टोबर महिन्यात विभागात ३३७ टक्के पाऊस सरासरीच्या अधिक झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळाने तर यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार बाजरी ९० टक्के, मका ९० टक्के , सोयाबीन ८० टक्के तर कापसाचे ७५ टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे देण्यात आला आहे.
जिल्हा बाधित गावे नुकसान टक्केवारी
उस्मानाबाद ७३२ ४१.४३%
नांदेड १,४८८ ५४.२५%
औरंगाबाद १,३५५ ५९.०५%
परभणी ८४३ ५९.३९%
हिंगोली ७०७ ६०.९३%
लातूर ९५१ ६२.२०%
बीड १,४०२ ७३.३२%
जालना ९७२ ७०.४०%
एकूण ८,४५० ७० %च्या आसपास