झुंडशाहीमुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान - चंद्रकांत कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 07:08 PM2017-08-27T19:08:15+5:302017-08-27T19:08:34+5:30
निर्मिती केल्यानंतर चित्रपट जेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीसाठी पाठविण्यात येतो. तेव्हा निर्माता, दिग्दर्शक तणावाखाली असतो. सेन्सॉर समिती सदस्यांच्या डोक्यात काय येईल अन् काय खटकेल याचाच विचार करावा लागतो. यातही झुंडशाहीच्या दबावामुळे अनेक संवाद, चित्र कट करावे लागतात. हाच चित्रपटसृष्टीला सर्वांधिक धोका आणि नुकसान असल्याचे मत सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद, दि. 27 : निर्मिती केल्यानंतर चित्रपट जेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीसाठी पाठविण्यात येतो. तेव्हा निर्माता, दिग्दर्शक तणावाखाली असतो. सेन्सॉर समिती सदस्यांच्या डोक्यात काय येईल अन् काय खटकेल याचाच विचार करावा लागतो. यातही झुंडशाहीच्या दबावामुळे अनेक संवाद, चित्र कट करावे लागतात. हाच चित्रपटसृष्टीला सर्वांधिक धोका आणि नुकसान असल्याचे मत सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयातर्फे ‘सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप’ या विषयावर रविवारी (दि. २७) या एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मराठी सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारूरकर होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके उपस्थित होते.
स्वत:वर सेन्सॉरशिप असावी
चित्रपटाच्या परवानगीवेळी झुंडशाहीची सेन्सॉरशिप सर्वांधिक गंभीर असते. सत्तांतर झाले की, त्याठिकाणच्या सर्व समित्या बदलतात. आपल्या विचारांच्या लोकांची त्याठिकाणी वर्णी लावली जाते. त्या विचारातुनच सेन्सॉरचा त्रास सहन करावा लागतो, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. सध्या चित्रपट वेगाने बदलत आहे. त्यात काही सकारात्मक बदलही होत असल्याचे हि कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच आता आपण स्वत:च स्वत:वर एक सेन्सॉरशिप घालून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. धारुरकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये झालेल्या बदलाचा आढावा घेतला. या चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमीका संयोजक प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी प्रस्ताविकात मांडली. डॉ. आशा देशपांडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. उद्घाटनाच्या सत्रानंतर दुपारी दोन सत्रांमध्ये चर्चा करण्यात आली. चर्चासत्राचा समारोप ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दिक्षित यांच्या उपस्थितीत झाला.
राज ठाकरेंचा गांधी चित्रपट आवडता
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा सर्वांधिक आवडता चित्रपट गांधी हा आहे. जे.जे. महाविद्यालयात शिकत असताना सलग महिनाभर दररोज न चुकता गांधी चित्रपटाचे शो पाहिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांनी चित्रपटातील विचारांचे आचरण कधीही केले नाही. यामुळे कोणाला कलाकृती आवडू शकते, विचार आवडत नसले तरी कलाकृतीचा सन्मान झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.