समृद्धीचा पूल बांधकामामुळे दुधडच्या शेतकऱ्याचे नुकसान!
By | Published: December 6, 2020 04:00 AM2020-12-06T04:00:23+5:302020-12-06T04:00:23+5:30
दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे ...
दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे. मात्र, सहा महिन्यांपासून नुकसानभरपाई मिळाली नाही. तर बांधकाम कंपनीला मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्या तरी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून शेतकऱ्याशी अरेरावी केली जात आहे. हा प्रकार गुरुवारी घडल्यानंतर पुन्हा गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गाचे काम भांबर्डा (ता. औरंगाबाद) येथून जात असून या महामार्गालगत असलेल्या शेतकरी संतोष दिवटे यांचे दोन एकर जमिनीतील डाळिंबाचे नुकसान केवळ पाणी वळविल्याने झाले होते. पुलाच्या कामासाठी महामार्गालगत असलेला जुना पूल बंद करण्यात आला. वाहत येणारे पाणी थेट नवीन तयार करण्यात आलेल्या नाल्यात न सोडता शेतकरी दिवटे यांच्या शेतात सोडण्यात आले. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे दिवटे यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर संबंधित विभाग या पिकाचा पंचनामा करून गेला होता. पंचनामा करून गेल्यावर सहा महिने झाले तरी फिरकले नाहीत. मदत न मिळाल्याने अखेर शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांशी अरेरावी
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा व मदत द्या, अशा सूचना देण्यात आल्या. कंपनीचे व्यवस्थापक नरसिंह कुंडी, समन्वयक अधिकारी अंबादास घागरे हे गुरुवार, ३ रोजी आले होते. सदर चर्चा करत असताना मेघा कंपनीच्या मॅनेजरकडून शेतकऱ्यांना हातवारे करत अरेरावीची भाषा वापरून अपमान करण्यात आला.
फोटो -