२०१६ मध्ये झाले नुकसान; २०१८ मध्ये दिले अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:12 PM2018-07-21T14:12:26+5:302018-07-21T14:13:17+5:30
दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी अनुदान जाहीर केले.
औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी राज्यभरासाठी ५१५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४९ कोटी रुपये मिळणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीचा लाभ दोन वर्षांनी देण्याचे जाहीर होत असल्यामुळे शासन किती गतिमानतेने काम करीत आहे, याचा प्रत्यय येत आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के व त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना ही मदत मिळणार आहे. ही रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येणार असून त्यातून बँकेने खातेदारांच्या खात्यातून कोणतीही थकबाकी वसूल करू नये, अशा सूचना शासनाने विभागीय आयुक्तांना केल्या आहेत.
औरंगाबादला फक्त ५१ लाख
औरंगाबाद जिल्ह्यातील २४८८ शेतकऱ्यांना ५१ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. सुमारे साडेतीन हजार रुपये प्रती हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यावर जाणे अपेक्षित आहे. पीक विमा नुकसानभरपाईच्या ५० टक्क्यांप्रमाणे ही मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १६ व १७ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले होते. दोन वर्षांनंतर शासनाने तुटपुंजी का होईना शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
मराठवाड्याला दिले ४९ कोटी
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी शासनाने ४९ कोटी रुपये दिले आहेत. २१ लाख ५० हजार २८४ शेतकऱ्यांना ती मदत मिळणार आहे. यामध्ये औरंगाबादला ५१ लाख, परभणी ५० लाख, हिंगोली सव्वाकोटी, नांदेड २६ कोटी, बीड ६ कोटी तर लातूरला ५ कोटी, उस्मानाबादला ११ कोटी असे सुमारे ४९ कोटींच्या आसपासची रक्कम विभागाला मिळणार आहे.