हरवलेली दुचाकी मिळाली, पण पोलिसांना माहिती न दिल्याने मालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 07:22 PM2021-11-29T19:22:59+5:302021-11-29T19:25:53+5:30
दुसऱ्या गावातील पोलिसांनी सापडली, न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेऊन नंतर २५ हजार रुपयांत विकली
औरंगाबाद : शहरातून हरवलेली दुचाकी श्रीरामपूर पोलीस ठाण्यातून मिळाल्यानंतर त्याची माहिती औरंगाबादच्या संबंधित पोलीस ठाण्याला न देताच मालकाने परस्पर विकली. या मालकास दुचाकीसह गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केले.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे यांच्या पथकाला पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी बाबू गॅरेज, जालना रोड येथे उभी असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेने विनानंबरची दुचाकी ताब्यात घेतली. चेसिस क्रमांकावरून ती पुंडलिकनगर हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी (एमएच २१ बीएल १७५६) असल्याचे स्पष्ट झाले. गॅरेज मालकाने ही गाडी बजाज फायनान्सकडून खरेदी केल्याचे सांगितले. यानुसार मूळ फिर्यादी कल्याण आर्सूड यास चौकशीसाठी बोलावले असता, त्याने सांगितले की, घरासमोरून दुचाकी चोरीस गेली होती.
पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दिली होती. ती २०१९ मध्येच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातून मिळाली. न्यायालयाच्या आदेशाने ती ताब्यात घेऊन नंतर २५ हजार रुपयांत विकली आहे; पण पुंडलिकनगर पोलिसांना याबाबत काहीही माहिती दिली नसल्यामुळे फिर्यादीवरच पोलिसांनी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आर्सूड यास दुचाकीसह पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही कामगिरी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, अंमलदार नजीरखॉ पठाण, योगेश नवसारे, राजाराम डाखुरे, अश्वलिंग होनराव, सुनील मोटे, ज्ञानेश्वर पवार आणि लखन गायकवाड यांच्या पथकाने केली.