वेगामुळे जीव गमावला; भरधाव स्पोर्ट्सबाईक दिशादर्शक फलकाला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:47 PM2022-06-21T19:47:47+5:302022-06-21T19:49:06+5:30
कागजीपूरा येथील घटना, मृत औरंगाबाद येथील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी
खुलताबाद (औरंगाबाद) : कागजीपूरा येथील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली. बाईकचा वेग खूप जास्त असल्याने दिशादर्शक फलकाला धडक दिल्यानंतर दोघेही रस्त्याच्या खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच दगावले.
औरंगाबाद येथील मधूर बाळासाहेब भंडगे ( २३ रा. धन्वंतरीनगर, सातारा परिसर, औरंगाबाद ) आणि जयेश निरंजन घोरपडे ( २२ रा. पहाडसिंगपुरा औरंगाबाद ) अशी मृतांची नावे आहेत. मधुर आणि जयेश आज सायंकाळी आणखी दोन मित्रांसह दोन दुचाकीवर (खुलताबादकडे ) येते होते. दरम्यान, कागजीपुरा येथील वळणावर नियंत्रण सुटल्याने मधूर व जयेश यांची स्पोर्ट्स बाईक (एम. एच. २० ई. व्ही. १११३) थेट दिशादर्शक फलकावर धडकली.
वेग जास्त असल्याने मधुर आणि जयेश रस्त्याच्या खाली कोसळले. याच वेळी दोघांचेही डोके दगडांवर आदळले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच खुलताबादचे बीट जमादार शेख जाकीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. कागजीपुराचेसरपंच शेख अहेमद, मयूर फुलारे इतरांनी मदतकार्य केले. जयेश घोरपडे व मधूर भंडगे हे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.