बागायती अनुदानाला खो
By Admin | Published: May 31, 2016 11:10 PM2016-05-31T23:10:00+5:302016-05-31T23:14:12+5:30
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड बागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड
बागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी याबाबत काहीच बोलत नसल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनावरच समाधान मानावे लागत आहे.
नापिकी व कर्ज बाजारीपणाच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला सरकारचा दुष्काळी अनुदानाच्या रूपाने आधार दिल्याचा बोलबाला सत्ताधाऱ्यांनी केला. बागायती असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रूपये अनुदान देऊ अशी घोषणा तीन महिन्यांपूर्वी सरकारने केली. दुष्काळी अनुदान तीन टप्यात वाटप होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले होते. यामध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी साडेसहा हजार, बागायतीसाठी हेक्टरी दहा हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी अठरा हजाराच्या जवळपास अनुदान देण्याची घोषणा झाली होती. यामध्ये कोरडवाहू असलेले दोन लाख शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. बागायतीच व फळबागांचे दुष्काळी अनुदान आले नसल्याचे जिल्हा प्रशासनातील संबंधीत अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर फळबागा आहेत. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या बागा पाण्याअभावी तोडून टाकाव्या लागल्या. या नुकसानीची भरपाई मिळेल या आशेवर असलेल्या बळीराजाची निराशाच झाली.
८५ कोटींची मागणी : असे आहे क्षेत्र...
कोरडवाहूनचे दोन लाख शेतकरी दुष्काळापासून वंचित राहिलेले आहेत तर बागायती असलेल्या १ लाख ४३ हजार ६६३ हेक्टर तर जिल्हयात १३ हजार हेक्टर एवढे फळबागाचे क्षेत्र आहे. बीड, धारूर, गेवराई, अंबाजोगाई व परळी तालुक्यात फळबागांचे पाण्याअभावी सरपन झालेले आहे. नुकसानीची भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर पेरणीसाठी अनुदानाचे पैसे बळीराजाच्या उपयोगी पडले असते, मात्र शासनाकडूनच पैसे मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनही हतबल आहे.