विधानसभेतील वाताहत; महापालिकेची सत्ताही महाविकास आघाडीला मिळवणे अवघड

By मुजीब देवणीकर | Published: December 2, 2024 04:23 PM2024-12-02T16:23:20+5:302024-12-02T16:25:09+5:30

मविआ आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढेल किंवा नाही, याबाबत उद्धवसेनेतील नेतेही साशंक आहेत.

lost in Legislative Assembly election; Municipal government is also difficult for Mahavikas Aghadi | विधानसभेतील वाताहत; महापालिकेची सत्ताही महाविकास आघाडीला मिळवणे अवघड

विधानसभेतील वाताहत; महापालिकेची सत्ताही महाविकास आघाडीला मिळवणे अवघड

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची शहरासह जिल्ह्यात बरीच वाताहत झाली. आघाडीचा एकही आमदार निवडून आणता आला नाही. याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकीतही दिसतील. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून शासनाने निवडणुका घेण्याचे ठरविले, तर महायुती तीन वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. त्यात महाविकास आघाडीची मोठी दमछाक होणार आहे.

महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८८ मध्ये झाली. तेव्हापासून २०२० पर्यंत महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीने एकहाती अधिराज्य गाजविले. २०१९ मध्ये राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. शेवटच्या एक वर्षात महापौर शिवसेनेचाच होता. २०२० मध्ये निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र, कोरोना संसर्ग सुरू झाला. तेव्हापासून महापालिकेच्या निवडणुकाही झाल्या नाहीत. दोन वेळेस निवडणूक आयोगाने पॅनल पद्धतीची तयारी केली. मात्र, पुढे कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. तिन्ही मतदारसंघांतील विजयी उमेदवारांच्या आकडेवारीवर एक नजर फिरविली तर आगामी मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कितपत निभाव लागेल, असे दिसते. महापालिका निवडणूक लढवताना शिवसेनेकडे तरी काही प्रमाणात लहान-मोठे नेते आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे निवडणुकीत प्रभाव टाकतील, असे नेते नाहीत. पॅनल पद्धतीत ताकदीचे उमेदवार हवे असतात. शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीची उमेदवार देताना दमछाक होईल.

मनपा हद्दीतील विधानसभेला मिळालेली मते
महायुती- ३,०४, ९५२
मविआ- १,५५,८१३
एमआयएम- १,६८,४५३

मविआ एकत्र लढेल का?
मविआ आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढेल किंवा नाही, याबाबत उद्धवसेनेतील नेतेही साशंक आहेत. विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांची हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे उद्धवसेना स्वबळावरही निवडणूक लढू शकेल, असा अंदाज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र उद्धवसेनेसोबत लढण्यास इच्छुक आहेत.

२०१५ मधील पक्षीय बलाबल
शिवसेना- २८
भाजप- २३
एमआयएम- २४
काँग्रेस- १२
राष्ट्रवादी- ०४
बीएसपी- ०४
अपक्ष- १८
रिपाइं (डी)- ०२
एकूण ११५

वेगळे लढल्यास यश अधिक
मनपा निवडणूक कार्यकर्त्यांसाठी असते. प्रत्येक वॉर्डात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मविआ म्हणून निवडणूक लढल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. स्वतंत्र उद्धवेसेनेने लढल्यास कार्यकर्त्यांना उमेदवारी जास्त मिळेल. मनपात सर्वांत मोठा पक्ष म्हणून उद्धवसेना ठरेल. वरिष्ठांचा निर्णय सर्वांना मान्य राहील.
- नंदकुमार घोडेले, माजी महापौर, उद्धवसेना.
 

Web Title: lost in Legislative Assembly election; Municipal government is also difficult for Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.