पाकिस्तानमध्ये पासपोर्ट हरवला; १८ वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर हसीना बेगम औरंगाबादमध्ये परतल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:44 PM2021-01-27T12:44:18+5:302021-01-27T12:46:10+5:30
Woman Returned To India After 18 Years from Pakistan : प्रजासत्ताक दिनी मंगळवारी ( दि. २६ ) हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या आहेत.
औरंगाबाद : पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तान न्यायालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. प्रजासत्ताक दिनी मंगळवारी ( दि. २६ ) हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरातील आहेत. त्यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. १८ वर्षांपूर्वी त्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासही पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचा पासपोर्ट लाहोर येथे हरवला. यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये कैद करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.
औरंगाबाद पोलिसांचे मानले आभार
भारतात परतल्यानंतर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. पाकिस्तानातील अनुभवाबाबत हसिना बेगम यांनी सांगितले की, मी अत्यंत बिकट परिस्थितीत होते. या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या मदतीबाबत मी खूप आभारी आहे. मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. हसिना बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनी सुद्धा औरंगाबाद पोलिसांनी त्यांना देशात परत आणण्यासाठी मदत केल्याबाबत धन्यवाद व्यक्त केले.
पाकिस्तानला पाठवली माहिती
हसिना बेगम यांनी पाकिस्तानच्या न्यायालयात त्या निर्दोष असल्याचा विनंती अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने भारतीय पोलिसांना संपर्क साधून माहिती मागवली. औरंगाबाद पोलिसांनी तत्काळ पाकिस्तान न्यायालयास शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनअंतर्गत हसीना बेगम यांच्या नावे एक घर रजिस्टर्ड आहे अशी माहिती पाठवली. यानंतर पाकिस्तानने गेल्या आठवड्यात हसीना बेगम यांना मुक्त करत भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.