‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची लागली ‘लॉटरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:02 AM2021-03-25T04:02:57+5:302021-03-25T04:02:57+5:30
औरंगाबाद : मार्गदर्शकांकडे पीएच.डी.च्या नेमक्या किती जागा रिक्त आहेत, अनेक महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र नसल्यामुळे तेथे कार्यरत मार्गदर्शकांच्या ...
औरंगाबाद : मार्गदर्शकांकडे पीएच.डी.च्या नेमक्या किती जागा रिक्त आहेत, अनेक महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र नसल्यामुळे तेथे कार्यरत मार्गदर्शकांच्या जागा घटतील का, यासारखे अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत असल्यामुळे ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती; परंतु बुधवारी व्यवस्थापन परिषदेने उपसमितीचा अहवाल सुधारणांसह मान्य केला आणि विद्यार्थ्यांची लॉटरीच लागली. आता तब्बल ३ हजार ८२९ रिक्त जागांवर संशोधनासाठी प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून संशोधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदा पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) घेतली आणि त्यात ४ हजार २९९ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रवेश मिळेला का. ‘युजीसी’च्या परिपत्रकामुळे महाविद्यालयीन मार्गदर्शकांवर निर्बंध येणार होते. महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र नसेल, पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणारे दोन पात्र अधिव्याख्याते नसतील किंवा तिथे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जात नसेल, तर अशा महाविद्यालयांतील मार्गदर्शक अधिव्याख्यात्यांकडे संशोधन करता येणार नाही, या ‘युजीसी’च्या मार्गदर्शक सूचना आहेत. ‘युजीसी’च्या सूचनांचा आदर करत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी यासंदर्भात मधला मार्ग काढण्यासाठी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली.
बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेने या उपसमितीचा अहवाल सुधारणांसह स्वीकारला. अशा महाविद्यालयांतील मार्गदर्शक अधिव्याख्यात्यांनी जवळच्या महाविद्यालय अथवा विद्यापीठातील संशोधन केंद्रांसोबत जोडणी करत (क्लबिंग) संशोधन करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. त्यामुळे मान्यताप्राप्त सर्व अधिव्याख्यात्यांना विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करता येईल. परिणामी, संशोधनाच्या एकूण ३ हजार ८२९ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना आता संशोधनासाठी प्रवेश घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, किशोर शितोळे, डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. राजेश करपे, संजय निंबाळकर, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. हरिदास विधाते, सुनील निकम, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. सचिन देशमुख उपस्थित होते.
चौकट....
कोरोनामुळे बैठक संस्थगित
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे संशोधनाच्या जागांसंबंधी उपसमितीचा अहवाल स्वीकारला. त्यावर महत्त्वाची चर्चा झाली व आजची व्यवस्थापन परिषदेची बैठक संस्थगित करण्यात आली. पुढील बैठकीत विद्यापीठ निधीतील ६० कर्मचाऱ्यांना किमान वेतनवाढ व तत्कालीन कुलगुरूंच्या कार्यकाळात ‘नॅक’ मानांकन मिळविण्यासाठी विद्यापीठात झालेल्या पायाभूत सुविधांमध्ये अवास्तव खर्च झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यासंबंधी नेमलेल्या निंबाळकर समितीच्या अहवालावर चर्चा होणार आहे.