Love Aurangabad : दिवाळीपूर्वी शहर होणार स्वच्छ; महापालिकेने केले दहा दिवसांचे वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 03:32 PM2020-11-06T15:32:13+5:302020-11-06T15:34:14+5:30
दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी दहा दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे
औरंगाबाद : लव्ह औरंगाबाद मोहिमेंतर्गत शहर स्वच्छतेचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असून, दिवाळीपूर्वी शहराची साफसफाई करण्याच्या हेतूने दहा दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचे वेळापत्रक तयार केले आहे. ही मोहीम स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असणार आहे. मनपा कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांनी यात सहभागी होण्यासाठी दोन स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहेत.
दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी दहा दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचे वेळापत्रक तयार करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापक नंदकुमार भोंबे यांनी दिली. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेने दहा दिवसांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यात ४ नोव्हेंबरला झोन कार्यालयांतर्गत विभागनिहाय विशेष साफसफाई मोहीम घेण्यात येईल. ५ नोव्हेंबरला महापालिका उद्यान, ६ नोव्हेंबरला शहरातील गेट, ऐतिहासिक वास्तू, स्थळे, ८ नोव्हेंबरला झोनमध्ये विविध ठिकाणी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करणे, ९ नोव्हेंबरला महापालिका शाळा आणि रुग्णालये, १० नोव्हेंबरला शासकीय कार्यालय, ११ नोव्हेंबरला व्यावसायिक जागा, १३ नोव्हेंबरला झोनअंतर्गत येणाऱ्या सर्व दुभाजकांची साफसफाई करण्यात येणार आहे.
या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्यासाठी त्याअनुषंगानेही वेळापत्रक तयार केले आहे. ४ नोव्हेंबरला नागरिकांनी घराची साफसफाई करावी. ५ नोव्हेंबरला परिसरातील स्वच्छता, ६ नोव्हेंबरला गृहनिर्माण संस्था आणि वसाहती, ७ नोव्हेंबरला ९ झोनअंतर्गत होणाऱ्या मेगा सफाई मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा. ८ नोव्हेंबरला वृक्षारोपण मोहीम, ९ नोव्हेंबरला पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू बनविणे, १० नोव्हेंबरला सोशल मीडियावर शहर स्वच्छतेसंदर्भात आवाहन करणारे पोस्ट तयार करून नावीन्यपूर्ण कल्पना, सूचना कराव्यात. ११ नोव्हेंबरला मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ‘वॉल ऑफ ह्युमॅनिटी’अंतर्गत घरातील जुने कपडे, वस्तू दान करणे तर १३ नोव्हेंबरला स्वच्छता कामगारांचे आभार मानणे, असे नियोजन करण्यात आले आहे.
सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र देणार
या मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. नागरिक, संस्था, संघटनांनी स्वच्छताविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भोंबे यांनी केले आहे.