सोशल मीडियावर प्रेम जुळले; प्रियकराच्या ओढीने पुण्याहून अल्पवयीन प्रेयसी छ. संभाजीनगरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:39 PM2023-07-07T12:39:10+5:302023-07-07T12:39:41+5:30
नातेवाईकांनी प्रेमी युगलास केले पोलिसांच्या स्वाधीन
वाळूज महानगर : सोशल मीडियावर प्रेम जुळले. प्रियकराच्या ओढीने पुणे येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वाळुजला आली. यानंतर हे प्रेमप्रकरण अंगलट येईल, असे दिसताच नातेवाईकांनी गुरुवारी या प्रेमी युगलास एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीनही केले.
पुणे जिल्ह्यातील खडकी येथील रहिवासी प्रिया (१४, नाव बदलले आहे) या अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर वेरुळ येथील एका हॉटेलवर काम करणाऱ्या अक्षय (१८, नाव बदलले आहे) याच्या सोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीनंतर सोशल मीडियावरून दररोज चॅटींग व संभाषणानंतर प्रिया व अक्षय यांचे प्रेम जुळले. विशेष म्हणजे, अक्षय याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून प्रियाचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. या प्रेमप्रकरणानंतर प्रिया व अक्षय या दोघांनी ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’च्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशातच प्रिया हिने ३ जुलै रोजी घरच्यांचा डोळा चुकवत प्रियकर अक्षय यास भेटण्यासाठी पुणे येथून बसने थेट वाळूजला आली. उद्योगनगरीत पोहोचताच प्रिया हिची चातकासारखी वाट बघणाऱ्या अक्षय याने तिला सोबत घेत पाटोदा येथे एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. प्रिया ही घरातून गायब झाल्याने तिच्या पालकांनी तिचा नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला. प्रिया हिच्याकडे असलेला मोबाइलही बंद असल्याने तसेच तिचा शोध लागत नसल्याने तिच्या पालकांनी प्रिया हिचे अपहरण झाल्याची तक्रार पुण्यात दाखल केली होती.
नातेवाईकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
गत तीन दिवसांपासून प्रिया व अक्षय हे प्रेमीयुगल पाटोद्यात नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला होते. प्रिया ही अल्पवयीन असल्याने तसेच ती अक्षयसोबतच राहण्याचा हट्ट धरीत असल्याने अक्षय याच्या नातेवाईकांनी प्रकरण अंगलट येईल या भीतीपोटी दोघांना सोबत घेऊन गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक संदीप शिंदे, महिला पोलिस कर्मचारी प्रियंका तळवंदे यांनी प्रिया हिचे समुपदेशन करून पुण्यात तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. प्रिया हिच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पुण्यातील पोलिस ठाण्यात दिल्याचे सांगितले. यानंतर पुणे पोलिस प्रिया हिच्या पालकांना सोबत घेऊन तिला आणण्यासाठी उद्योगनगरीकडे निघाले असल्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.