लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख, अर्ज केला का?

By विजय सरवदे | Published: March 14, 2024 01:15 PM2024-03-14T13:15:23+5:302024-03-14T13:16:16+5:30

चालू आर्थिक वर्षासाठी ५० लाखांची तरतूद प्राप्त

lovely daughter will get 1 lakh till 18 years, did you apply? | लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख, अर्ज केला का?

लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख, अर्ज केला का?

 

छत्रपती संभाजीनगर : मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, बालविवाह रोखणे, यासाठी राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ ही योजना एप्रिल २०२३ पासून अमलात आणली आहे. आतापर्यंत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सुमारे १ हजार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत; पण त्यापैकी ३४३ परिपूर्ण प्रस्ताव असून ते पोर्टलवर अपलोड केले जात आहेत. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षाकरिता जि.प. महिला व बालविकास विभागाकडे ५० लाखांची तरतूद प्राप्त झाली आहे.

ही योजना मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशनकार्ड आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मलेल्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

१) काय आहे लेक लाडकी योजना?
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, मुलींमधील कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे. एकंदरीत मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी’ या नावाने नवीन योजना सुरू केली आहे.

२) योजना कोणासाठी?
पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. शिवाय, आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रीया केलेली असावी.

३) कागदपत्रे काय लागतात?
लाभार्थीचा जन्मदाखला, कुटुंबप्रमुखाचा तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधारकार्ड (प्रथम लाभाच्या वेळी ही अट शिथिल), पालकांचे आधारकार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकार्ड साक्षांकित प्रत (पिवळे अथवा केशरी).

४) १८व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख
या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १ हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.

५) आतापर्यंत जिल्ह्यातून १००० अर्ज
आतापर्यंत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सुमारे १ हजार प्रस्ताव प्राप्त झाले; पण त्यापैकी परिपूर्ण ३४३ प्रस्ताव असून, ते पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहेत.

६) अर्ज कोठे व कसा कराल?
आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

Web Title: lovely daughter will get 1 lakh till 18 years, did you apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.