यंदा सर्वांत कमी पाऊस

By Admin | Published: August 11, 2014 12:13 AM2014-08-11T00:13:10+5:302014-08-11T00:18:48+5:30

दिनेश गुळवे बीड गेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे.

This is the lowest rainfall this year | यंदा सर्वांत कमी पाऊस

यंदा सर्वांत कमी पाऊस

googlenewsNext

दिनेश गुळवे बीड
गेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र, सध्या केवळ १३५ ते १४० मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वच हतबल झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात अद्यापही दोनशेपेक्षा अधिक टॅँकर सुरू आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्र्षांपासून सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटग्रस्त म्हणून संकट उभे असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोे. जिल्ह्यात २०१२ सालीही मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. तर, २०१३ मध्येही अशीच परिस्थिती असल्याने जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. जनावरांसाठी चाराप्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने ४० पेक्षा अधिक ठिकाणी छावण्या सुरू केल्या होत्या. आतापर्यंत अल्प पाऊस झाला असला तरी या पावसावर सहा लाख २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन बियाणांसह मशागत, खत, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला, आता मात्र पाऊसच नसल्याने भविष्यात काय होईल? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज ढग येतात, पाऊस मात्र वारंवार हुलकावणी देत आहे.
२०१० मध्ये ४५९ मि.मी, २०११ मध्ये ३९० मि.मी., २०१२ मध्ये १७९ मि.मी., २०१३ मध्ये ३८९ मि.मी. पाऊस झाला होता, तर यावर्षी आतापर्यंत (९ आॅगस्ट) केवळ १४० मि.मी. पाऊस झाला आहे. ही पावसाची सरासरी जिल्ह्याची असली तर अनेक मंडळांमध्ये तर परिस्थिती अधिकच भयावह आहे.
चारा छावण्या सुरू कराव्यात-आपेट
महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस पडत असला तरी बीड जिल्ह्यावर पावसाची अवकृपा आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर मशागतीवर हजारो रुपये खर्च केला आहे. मात्र, पाऊसच पडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत जनावरांना कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत करावी व चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट यांनी केली आहे.

Web Title: This is the lowest rainfall this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.