भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीत निष्ठावंतांना डच्चू ; आयारामांना मानाचे पान मिळाल्याने खदखद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:41 PM2023-05-04T12:41:03+5:302023-05-04T12:42:02+5:30
इतर पक्षांतून आलेल्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिल्याने निष्ठावंतात खदखद
छत्रपती संभाजीनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी राज्य कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेश पदाधिकारी ४७, कार्यकारिणी सदस्य ६४ आणि २८७ विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश असलेल्या जम्बो कार्यकारिणीत मराठवाड्यातील निष्ठावंतांना डच्चू मिळाल्याने अनेकांच्या मनात खदखद सुरू झाली आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान मिळाले, मात्र तीन ते चार दशकांपासून पक्षात काम करणाऱ्यांना संधी न मिळाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यकारिणी सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून दोन्ही ठिकाणी काही जणांचे नाव आले आहे. तर जे काँग्रेस व इतर पक्षांतून काल-परवा पक्षात आले, त्यांना चिटणीसपदावर संधी देण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये १७ उपाध्यक्षांत गजानन घुगे, अजित गोपछडे, एजाज देशमुख हे तिघे ३ मराठवाड्यातील आहेत. सहा सरचिटणीसांमध्ये संजय केणेकर हे एकमेव मराठवाड्यातील आहेत. १६ चिटणीसांमध्ये देवीदास राठोड, शालिनी बुंदे, सुरेश बनकर आणि किरण पाटील तर संघटनमंत्री संजय कौडगे यांचे नाव यादीत आहे.
काँग्रेसमधून आलेले किरण पाटील यांनी शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढविली. त्यांना राज्य कार्यकारिणीत संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी महापौर, उपमहापौरांसह काही माजी नगरसेवकांना प्रदेश कार्यकारिणीत संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना संधी मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. बसवराव मंगरूळे यांना उपाध्यक्षपदावरून काढून कार्यकारिणी सदस्य करण्यात आले आहे. साधना सुरडकर यांनाही कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.
मकरिये यांना ऐन वेळी डावलले
सहकार मंत्री अतुल सावे यांचे निकटवर्तीय तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले अनिल मकरिये यांना ऐन वेळी डावलण्यात आल्याची कुजबुज सुरू आहे. त्यांना उपाध्यक्ष करण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला होता. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. याप्रकरणी मकरिये यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
मराठवाड्यातून किती जणांना संधी?
मराठवाड्यातून प्रदेश कार्यकारिणीच्या प्रमुख प्रवाहात फक्त ९ जणांना संधी मिळाली आहे. तर १० कार्यकारिणी सदस्य विभागातील आहेत. विशेष निमंत्रितांमध्ये विद्यमान मंत्री, माजी आमदार व पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.