गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’

By विजय सरवदे | Published: July 13, 2023 07:55 PM2023-07-13T19:55:57+5:302023-07-13T19:56:48+5:30

आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

'Lumpi' will stop outside the gate of the village; 'Target' for vaccination of fifty three lakh animals | गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’

गावच्या वेशीबाहेरच ‘लम्पी’ रोखणार; पावणेतीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे ‘टार्गेट’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : थांबलेल्या ‘लम्पी’ संसर्गजन्य आजाराने पुन्हा तोंड वर काढू नये, म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला असून, आता हा आजार वेशीबाहेरच रोखण्यासाठी लसीकरण, तसेच गोठा फवारणीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पावणेतीन लाख जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने यांनी दिली.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ‘लम्पी’ आजाराचा शिरकाव झाला. बघता-बघता या आजाराने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढावले. या आजाराने मार्चअखेरपर्यंत ११ हजार ९७२ जनावरे बाधित झाली, तर १ हजार २५२ जनावरे मरण पावली. त्यामुळे शेतकरी पशुपालकांचे आतोनात नुकसान झाले. आता पुन्हा लम्पीचा गावांत शिरकाव होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. एक मिशन म्हणून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.

जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार गोवंश जनावरे आहेत. सध्या या विभागाकडे बफर स्टाॅकमध्ये असलेली ५५ हजार लस व नुकत्याच शासनाकडून प्राप्त २ लाख १३ हजार लसी या येत्या आठ ते दहा दिवसांत गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत. बाधित गावांपासून पाच किलोमीटर त्रिजा परिसरातील गावांसाठी एक याप्रमाणे जिल्ह्यात १४८ ईपीक सेंटर स्थापन केले होते. पहिल्या टप्प्यात या ईपीक सेंटर परिसरातील जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर, शासनाकडून मिळणाऱ्या लसी जिल्ह्यातील उर्वरित गावांतील सर्व गोवंश जनावरांना दिल्या जाणार आहेत.

गोठ्यांची स्वच्छता महत्त्वाची
प्रामुख्याने गोमाशा, गोचीड आणि चिलटांमुळे ‘लम्पी’ हा संसर्ग आजार गोवंश जनावरांना होतो. गोठ्यापर्यंत हा आजार येऊच नये, यासाठी पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रशिक्षित ‘लम्पी’दूत गावागावांत जाऊन गोठ्यांची फवारणी करणार आहेत. त्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे, याशिवाय लसीकरणासाठीही प्रतिसाद द्यावा.
- डॉ.सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

लम्पीची लक्षणे
या आजाराची लागण झाल्यास जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते, जनावरांना ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, कास इत्यादी भागांच्या त्वचेवर १० ते ३० मिमी व्यासाच्या गाठी येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.

Web Title: 'Lumpi' will stop outside the gate of the village; 'Target' for vaccination of fifty three lakh animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.