सोयगावातील जनावरांना लम्पी स्कीन रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 06:43 PM2020-09-30T18:43:57+5:302020-09-30T18:45:24+5:30
सोयगाव तालुक्यातील पाच गावातील बैल प्रजातीच्या जनावरांना लम्पी स्कीन राेगाची बाधा झाली आहे. ही बाधा वाढली असल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला असून ११ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील पाच गावातील बैल प्रजातीच्या जनावरांना लम्पी स्कीन राेगाची बाधा झाली आहे. ही बाधा वाढली असल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला असून ११ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.
आतापर्यंत लम्पी स्कीन रोगातून पाच जनावरे मुक्त झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुंजाजी कंधारे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन जनावरांवर उपचार करून चिंतामुक्त व्हावे, असे आवाहनही डॉ. कंधारे यांनी केले. सोयगाव तालुक्यात सोयगाव आमखेडा, गलवाडा, जंगलातांडा आणि सोयगावला लागुनच असलेल्या जामनेर तालुक्यातील लिहातांडा या पाच गावात या सदृश्य रोगाची लक्षणे असलेली जनावरे आढळून आली आहेत.
या रोगाने त्रस्त असलेल्या जनावरांच्या त्वचेवर डाग आणि चट्टे आढळून येत असून, काही ठिकाणी त्वचेवर लालसर रंगाच्या जखमाही आढळून आल्या आहेत. यामध्ये जनावरांची भूक मंदावते त्याचबरोबर जनावरांना ताप येवून अंगावरील केस सरळ उभे राहतात.