इथं जेवायला दोन वेळेसचं नाही आणि यांचं मात्र योगा - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:57 PM2018-06-21T23:57:39+5:302018-06-22T06:00:00+5:30
इथं लोकांना दोन वेळेसचं जेवण मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि यांचं सुरूआहे योगा, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण सरकारचा समाचार घेतला.
औरंगाबाद : इथं लोकांना दोन वेळेसचं जेवण मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि यांचं सुरूआहे योगा, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण सरकारचा समाचार घेतला.
जालना रोडवरील सागर लॉनवर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस बुथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करीत होते. मेळाव्यास विशेषत: ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर येथे होणारे पावसाळी अधिवेशन आम्ही शेतकºयांच्या प्रश्नांसाठी बंद पाडू, असा स्पष्ट इशाराही प्रदेशाध्यक्षांनी दिला. ‘यांचा’ काय पायगुण चांगला नाही. मनुवादाला खतपाणी घालणारी ही मंडळी. आता आपला वैचारिक दुश्मन आरएसएस तर कॅन्सरप्रमाणे गावागावांत पसरत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा वेळी अधिक गंभीर होऊन बुथ कमिट्या स्थापन करण्याचे काम पूर्ण केले पाहिजे. आरएसएस, भाजप व शिवसेनेशी आपला मुकाबला आहे व समविचारी पक्षांशी दोस्ती करून देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी जिल्ह्यातील मतदारसंघवार आढावा घेतला. तय्यब पटेल (पैठण), भाऊसाहेब जगताप (औरंगाबाद पूर्व), नामदेवराव पवार (औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम), गोकुळसिंग राजपूत व बाबासाहेब मोहिते (कन्नड), पंकज ठोंबरे (वैजापूर), भरत तुपलोंढे (गंगापूर), भगवान मुळे (फुुलंब्री), संजय मोरे (खुलताबाद), रामदास पालोदकर (सिल्लोड) व आबा काळे (सोयगाव) यांनी आपला अहवाल सर्वांसमोर ठेवला. ‘कुणी खरं काम केलंय व कुणी बंडला मारल्या आहेत’ हे माझ्या लक्षात आलंय. फुलंब्रीचं काम उत्कृष्ट झालं आहे’ असा शेरा चव्हाण यांनी मारला.
बघता काय मोर्चे काढा!
खा.चव्हाण यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली. राज्यात शेतकºयांची अवस्था वाईट आहे. १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कर्जमाफी कुठेच झालेली नाही. पण सरकार त्यांच्याकडे बघायला तयार नाही. हरभरा, तूर खरेदी नाही. पीक विमा कुठेच मिळालेला नाही. शेतकºयांना नवीन कर्जेही मिळत नाहीत. पाकिस्तानातून दाऊदला तर आणले नाहीच. पण तिथली साखर मात्र आणली. ही सारी परिस्थिती बघत बसू नका. शेतकºयांना कर्जे न देणाºया त्या- त्या बँकांंवर मोर्चे काढा, असा आदेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.