व्याजाच्या आमिषाने ३० लाखांना फसविले
By Admin | Published: July 8, 2017 12:37 AM2017-07-08T00:37:31+5:302017-07-08T00:41:00+5:30
औरंगाबाद : क्रेडिट सोसायटीत ठेवी ठेवल्यास वर्षभरानंतर दरमहा मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी एका सोसायटीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : क्रेडिट सोसायटीत ठेवी ठेवल्यास वर्षभरानंतर दरमहा मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच गुंतवणूकदारांना ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी एका सोसायटीच्या संचालकाविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला यापूर्वीच बलात्काराच्या गुन्ह्यात सिडको पोलिसांनी अटक केलेली आहे.
विलास लंबे पाटील (३९) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आरोपीने एपीव्हीएल क्रेडिट सोसायटी सिडकोतील बजरंग चौकात सुरू केली होती. या सोसायटीत ११ हजार रुपये गुंतविल्यास वर्षभरानंतर पुढील दहा महिने दरमहा २ हजार रुपये सोसायटीकडून तुम्हाला मिळतील, अशा प्रकारची जाहिरात त्याने केली होती. ही जाहिरात वाचून तक्रारदार अशोक नामदेव गुंजकर (५३, रा. विवेकानंदनगर, देऊळगावराजा, जि. बुलडाणा) आणि तेजराव डहाके हे २०१४ मध्ये आरोपींना भेटले होते. यावेळी आरोपीने त्याची सोसायटी नोंदणीकृत असल्याने गुंतवणूक सुरक्षित राहील, अशी खात्री दिली होती. ११ हजार रुपये ठेव ठेवल्यानंतर एक वर्षानंतर दरमहा २० हजार रुपये परतावा देण्याची हमी दिली. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गुंजकर यांनी ११ लाख तर डहाके यांनी २ लाख रुपये, असे एकूण १३ लाख रुपये ठेव म्हणून त्यांच्याकडे दिले. या ठेवीच्या पावत्या त्याने तक्रारदारांना दिल्या. ठेवीची मुदत संपल्यानंतर गुंजकर आणि डहाके हे ७ एप्रिल २०१५ रोजी सोसायटीच्या सिडको एन-६ येथील बजरंग चौकात असलेल्या कार्यालयात गेले. तेव्हा सोसायटीच्या कार्यालयाला कुलूप होते. यामुळे त्यांनी आरोपीच्या मोबाइलवर संपर्क साधला असता मोबाइल बंद असल्याचे त्यांना समजले. त्यांनी दोन वर्ष आरोपीचा शोध घेतला मात्र तो त्यांना भेटला नाही.
आरोपीने अनेकांना गंडा घालून सोसायटीला कायमस्वरुपी टाळे लावून तो पळून गेल्याचे त्यांना समजले. शेवटी त्यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन आरोपीने त्यांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली.