३० ते ६० टक्के परताव्याचे अमिष, ५९ गुंतवणूकदारांची १ कोटी ६० लाखांची फसवणूक

By राम शिनगारे | Published: November 5, 2023 07:48 PM2023-11-05T19:48:01+5:302023-11-05T19:48:10+5:30

जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Lure of 30 to 60 percent return, fraud of 1 crore 60 lakhs of 59 investors | ३० ते ६० टक्के परताव्याचे अमिष, ५९ गुंतवणूकदारांची १ कोटी ६० लाखांची फसवणूक

३० ते ६० टक्के परताव्याचे अमिष, ५९ गुंतवणूकदारांची १ कोटी ६० लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटसह इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीतुन ३० ते ६० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून ५९ जणांची १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातील पाच गुंतवणूकदारांनी समोर येत ३२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंदविला. गुन्हा नोंदविताना फसवणूक झालेले ४० पेक्षा अधिक गुंतवणूकदार ठाण्यात हजर असल्याची माहिती फिर्यादींनी दिली.

गुन्हा दाखल आरोपींची हनुमंत शिंदे व त्याची पत्नी मनिषा शिंदे अशी नावे आहेत. जवाहरनगर पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त देवानंद पांडुरंग पेंडलवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२२ मध्ये आरोपी शिंदे याच्या मालकीची एमएच ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास ३० ते ६० टक्के परतावा मिळत असल्याचा दावा आरोपींनी केला. त्यामुळे फिर्यादीने टप्प्याटप्प्याने ११ लाख रुपये गुंतवले. जून २०२३ पर्यंत ४ लाख ४३ हजार रुपये परतावा आरोपींनी दिला. त्यानंतर परतावा देणे थांबले.

पेंडलवार यांच्याशिवाय केशव सखाराम वाघ यांनी ४ लाख ५० हजार, पोपट नंदू शिंदे ८ लाख, सरोज प्रमोद सरकले यांनी ७ लाख आणि पल्लवी नितीन वर्णे यांनी २ लाख रुपये असे पाच जणांनी ३२ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेली रक्कम परत द्यावी, यासाठी त्यांनी आरोपींकडे तगादा लावला. मात्र, पैसे परत मिळाले नाहीत. शेवटी आपली फसवणूक झालेली असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पाच जणांनी पोलिसात धाव घेतली. पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी झाली. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास ज्येष्ठ निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक दिलीप चंदन करीत आहेत.

Web Title: Lure of 30 to 60 percent return, fraud of 1 crore 60 lakhs of 59 investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.