उन्मत्त रेड्याचा शाळेत धुमाकूळ; एका मिनिटात मॉडेल हायस्कूलचे १४ विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:50 IST2025-01-02T12:48:18+5:302025-01-02T12:50:02+5:30

नवखंडा पॅलेस कॅम्पसमधील घटना : शहरातही दोन ठिकाणी नागरिक जखमी

Mad buffalo storms school; 14 students of Model High School injured in one minute | उन्मत्त रेड्याचा शाळेत धुमाकूळ; एका मिनिटात मॉडेल हायस्कूलचे १४ विद्यार्थी जखमी

उन्मत्त रेड्याचा शाळेत धुमाकूळ; एका मिनिटात मॉडेल हायस्कूलचे १४ विद्यार्थी जखमी

छत्रपती संभाजीनगर : उन्मत्त झालेल्या रेड्याने नवखंडा पॅलेसच्या कॅम्पसमध्ये घुसखोरी करीत अवघ्या १ मिनिट १० सेकंदाच्या वेळेत मॉडेल हायस्कूलच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांना जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यावेळी एकच गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यातील १२ विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडून देण्यात आले. दोन विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

औरंगपुऱ्याकडून एक उन्मत्त रेडा सकाळी १० वाजेच्या सुमारास भडकल गेटमधून आला. त्यानंतर समाेरच्या रस्त्याने जात त्याने थेट मौलाना आझाद शिक्षण संस्थेचे महिला महाविद्यालय, मॉडेल हायस्कूलचा कॅम्पस असलेल्या नवखंडा पॅलेसमध्ये घुसखोरी केली. या कॅम्पसमध्ये जाण्यासाठी सुरुवातीलाच एक मोठा दरवाजा आहे. मात्र, रेडा जोरात आल्यामुळे तो दरवाजा लावणेही शक्य झाले नाही. दोन ठिकाणी सुरक्षारक्षकांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेड्याने तो झुगारून कॅम्पसच्या परिसरात १० वाजून ९ मिनिटांनी प्रवेश केला. त्यावेळी मॉडेल हायस्कूलचे विद्यार्थी मध्यांतर झाल्यामुळे डबा खाण्यासाठी मोकळ्या जागेत आले होते. उधळलेला रेडा पाहून सर्वांचाच गोंधळ उडाला. तेवढ्यात रेड्याने समोर येणाऱ्या विद्यार्थ्यांना उचलून बाजूला फेकले. काहींना धडक मारली. हे सर्व अवघ्या १ मिनिट १० सेकंदांत घडले. त्यात तब्बल १४ विद्यार्थी जखमी झाले. शिक्षक व दहावीच्या विद्यार्थ्यांनी काही वेळातच रेड्याला हाकलले. हा रेडा समोरच्या भागात न जाता कॅम्पसमधूनच एक मिनिटात परत फिरला. त्यानंतर त्याने किलेअर्कच्या दिशेने कूच केले. दरम्यान, शाळेत हाहाकार उडाला. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी घाटीत धाव घेतली.

औरंगपुरा, किलेअर्क परिसरातही हल्ला
उधळलेल्या रेड्याने औरंगपुऱ्यातही एका नागरिकास जखमी केले. त्यानंतर मॉडेल हायस्कूलनंतर रेडा किलेअर्कच्या दिशेने पळाला. तेथेही एका व्यक्तीला जखमी केले.

पोलिस अधिकाऱ्यांची शाळेत धाव
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, बेगमपुऱ्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी मॉडेल हायस्कूलमध्ये धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक, कॅम्पसचे संचालक ब्रिगेडियर हनिश कालरा यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर रेड्याच्या शोधात पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक जगताप यांनी दिली.

घटनेमुळे व्यवस्थापन व्यथित
या घटनेमुळे हायस्कूलचे व्यवस्थापन अत्यंत व्यथित झाले आहे. तसेच याविषयी खेदही व्यक्त करीत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दु:खात सहभागी असून, या संकटाच्या वेळी सर्व मदत करण्यास तत्पर असल्याचे निवेदन शाळा व्यवस्थापनाने प्रसिद्धीस दिले आहे.

सुरक्षारक्षकाकडून अडविण्याचा प्रयत्न
नवखंडा पॅलेस कॅम्पसच्या प्रवेशद्वाराच्या जवळ दोन सुरक्षारक्षक तैनात होते. त्यातील दरवाजाच्या पाठीमागे असलेल्या सुरक्षारक्षकाने रेड्याला काठीने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेडा जोरात आत घुसला. तेव्हा शेख जिलानी या सुरक्षारक्षकाने रेड्यासमोर दोन हात करून अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेड्याचा वेग अति असल्यामुळे ते बाजूला झाले. त्यानंतर कॅम्पसमध्ये रेडा घुसला.

अज्ञात रेडा मालकावर गुन्हा दाखल
सकाळच्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात रात्री अज्ञात रेडामालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेच्या वतीने रजिया सुलताना शेख इश्तियाक यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. सदर मालकाने त्याच्या रेड्यास काळजीपूर्वक न हाताळता व पुरेसा बंदोबस्त न केल्याने रेडा उधळून शाळेतील अनेक मुले जखमी झाली. त्यावरून बीएनएस कलमांतर्गत २९१, १२५ (अ), (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावर्षीचा बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल हा पहिला गुन्हा ठरला.

Web Title: Mad buffalo storms school; 14 students of Model High School injured in one minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.