'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर, वसतिगृहात अधिकाऱ्यांची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 20:19 IST2024-12-24T20:17:20+5:302024-12-24T20:19:20+5:30
शासकीय वसतिगृहाची दुरावस्था पाहून मंत्री शिरसाट यांनी यांनी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर, वसतिगृहात अधिकाऱ्यांची झाडाझडती
छत्रपती संभाजीनगर: आमदार संजय शिरसाट हे सामाजिक न्यायमंत्री पद स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज सकाळी मंत्री शिरसाट यांनी अचानक किलेअर्क परिसरातील १००० मुलांच्या शासकीय वसतिगृहास भेट दिली. वसतिगृहाची दुरावस्था पाहून शिरसाट यांनी येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
किलेअर्क येथे समाजकल्याण विभागाचे १००० मुलांचे वसतिगृह आहे. येथील मेसचे निकृष्ट जेवण, रूम, टॉयलेटची दुरावस्था यामुळे येथे राहणारे विद्यार्थी अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत. याबाबत सोमवारी (२३ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष अंभोरे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात किलेअर्क परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या खोल्यांचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या आहेत. स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेतील रक्कम शैक्षणिक वर्षं संपले तरी विद्यार्थ्यांचा खात्यावर जमा नाही. ती लवकरात लवकर जमा करावी, या शिष्यवृत्तीसाठी असलेल्या शैक्षणिक खंड, एटीकेटी अशा अनेक जाचक अटी काढून टाकाव्यात, विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज सकाळी साडेदहा वाजता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अचानक किले अर्क येथील वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या पाहणीत विद्यार्थ्यांना बेडची सुविधा नाही, पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, बाथरूमला दरवाजा, खिडक्यांना काचा नाहीत, सगळीकडे अस्वच्छता आहे, मेसचे निकृष्ट जेवण अशा अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या. वसतिगृहाची अवस्था कोंडवाड्यापेक्षाही वाईट असल्याचे म्हणत शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.
समाज कल्याण आयुक्तांकडून अहवाल मागवणार
मंत्री शिरसाट यांनी वसतिगृहाची परिस्थिती पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, येथे १६ अधिकारी पाहिजेत. पण सध्या ७ आहेत. त्यापैकी ३ गैरहजर आहेत. हे काय करणार आहेत विद्यार्थ्यांचे असा सवाल त्यांनी केला. आता ही माझी जबाबदारी आहे. मी 'फूल अॅक्शन' मध्ये उतरलो आहे. आता येथे समाज कल्याण आयुक्तांची भेट ठेवणार असून त्यांना पाहणी अहवाल सादर करायला सांगणार आहे. त्यानंतर २८ डिसेंबरला पुण्यात सर्व समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाराष्ट्राचा आढावा घेणार असल्याचे ही शिरसाट म्हणाले. आता मी या विभागाचा मंत्री असल्यामुळे इथून पुढे या सुविधा कशा द्यायच्या आणि सुधारणा कशी करायची हे मला माहीत आहे, असे आश्वासन शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच एवढा निधी येतो मग तो कुणाच्या घशात जातो, हे मी तपासणार असून, कुणाची गय करणार नाही. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणारा मग तो कुणी का असेना त्याला माफी नाही. त्याच्यावर कठोर कारवाई करणार, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
'मॅडम जरा शांत बसा', शिरसाट भडकले
मंत्री शिरसाट माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत होते. यावेळी त्यांच्या बाजूलाच उभ्या असणाऱ्या समाजकल्याण सहआयुक्त जयश्री सोनकवडे-जाधव या तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना काही तरी बोलत असल्याचे शिरसाट यांच्या निदर्शनास आले. यामुळे शिरसाट भडकले अन् 'ओ मॅडम जरा शांत बसा, तुमच्यामुळे ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तुम्ही चुकीची माहिती देऊ नका त्यांना. शांत रहा थोड' असे म्हणत सुनावले.