२४ हजार रुग्णांना दृष्टी देणाऱ्या ‘आरोग्य दूत’;या आहेत औरंगाबादच्या पहिल्या महिला आरोग्य उपसंचालक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:41 PM2022-03-08T16:41:49+5:302022-03-08T16:42:43+5:30
Women's Day Special: जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक म्हणून गोरगरीब आणि खेड्यापाड्यातील ज्येष्ठांची मोतीबिंदूमुळे विझलेली नेत्र ज्योत पुन्हा पेटविण्याचे काम त्यांनी केले आहे.
औरंगाबाद : दृष्टी कमी होण्याच्या कारणांपैकी मोतीबिंदू हे जगामध्ये अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. उतारवयात ही समस्या प्रामुख्याने उद्भवते. आरोग्यसेवेतील महिला आरोग्यदूत डाॅ. सुनीता गोल्हाईत यांनी मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व दूर करून गेल्या २० वर्षांत २४ हजार रुग्णांना दृष्टी दिली. जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक ते औरंगाबादच्या पहिल्या पूर्णवेळ आरोग्य उपसंचालक असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
औरंगाबाद आरोग्य उपसंचालकपदाचा डाॅ. गोल्हाईत यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्या मुंबईत आरोग्य उपसंचालक म्हणून कार्यरत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागातील २० वर्षांच्या कार्यकाळात त्या औरंगाबादेत सर्वाधिक काळ कार्यरत होत्या. जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक म्हणून गोरगरीब आणि खेड्यापाड्यातील ज्येष्ठांची मोतीबिंदूमुळे विझलेली नेत्र ज्योत पुन्हा पेटविण्याचे काम त्यांनी केले आहे. डाॅ. गोल्हाईत या मूळ जळगाव येथील असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण हे पुण्यात झालेले आहे.
औरंगाबादेतील आमखास मैदानासमोरील जिल्हा नेत्रविभागाची इमारत ही त्यांच्या देखरेखीतच उभी राहिली. त्यापूर्वी जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जाऊन मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जात असे. औरंगाबादच्या आरोग्य उपसंचालकपदी प्रभारी म्हणून महिला डाॅक्टरांनी कामकाज पाहिले आहे. परंतु पूर्णवेळ महिला आरोग्य उपसंचालक म्हणून रूजू होण्याचा मान डाॅ. गोल्हाईत यांना मिळाला आहे. औरंगाबाद, जालनासह परभणी आणि हिंगोली ही चार जिल्हे त्यांच्या अंतर्गत आहेत. येथील आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि आरोग्याच्या विविध कार्यक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर असल्याचे डाॅ. गोल्हाईत म्हणाल्या.
उपसंचालक असतानाही शस्त्रक्रिया
सध्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेत आहे. आरोग्य उपसंचालक म्हणून कार्यरत असले तरीही नेत्रशस्त्रक्रिया करण्यावर भर देणार आहे, असे डाॅ. सुनीता गोल्हाईत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.