बनावट मालक उभे करून जमिनीची केली परस्पर रजिस्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 07:54 PM2019-11-23T19:54:03+5:302019-11-23T19:55:04+5:30

रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यासह सात जणांचा समावेश

Made a mutual registry of land by standing fake owner | बनावट मालक उभे करून जमिनीची केली परस्पर रजिस्ट्री

बनावट मालक उभे करून जमिनीची केली परस्पर रजिस्ट्री

googlenewsNext

औरंगाबाद : बनावट जमीन मालक रजिस्ट्री कार्यालयात उभे करून त्यांच्याकडून गाडीवाट येथील गट नंबर ६२ मधील ८१ आर जमीन परस्पर खरेदी करून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात सात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

संपत हिरामण राठोड, (रा. घारदोन तांडा), रवींद्र नामदेव हिवराळे (रा. गारखेडा परिसर), दस्त नोंदणी अधिकारी, गोवर्धन मनसिंग चव्हाण आणि विमल विनायक राठोड, सीमा रवींद्र हिवराळे यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार हरीश ओमप्रकाश कौशिक (रा. हरियाणा) हे २००७ साली औरंगाबाद परिसरातील एका कंपनीत नोकरीला होते. तेव्हा त्यांनी आणि त्यांचे मित्र दिलीप खगेश्वर नायक यांनी भुजंग दादा नवपुते यांच्या मालकीची घारदोन तांडा येथील ८१ आर जमीन ९० हजार रुपयांमध्ये खरेदी केली होती. याबाबतचे नोंदणीकृत खरेदीखत त्यांनी करून घेतले होते.

डिसेंबर २००७ मध्ये हरीश आणि दिलीप हे दोघेही नोकरीनिमित्त पुणे येथे गेले आणि नंतर गावी हरियाणाला निघून गेले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ते औरंगाबादला आले आणि घारदोन तांडा येथील त्यांनी खरेदी केलेली जमीन पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्यांच्या जमिनीवर आरोपी गोवर्धन चव्हाण हा मालकीहक्क सांगू लागला. विमल विनायक राठोड (रा. जटवाडा) यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचे त्याने तक्रारदारांना सांगितले. यामुळे तक्रारदारांनी सातबारा आणि रजिस्ट्री कार्यालयातून खरेदीखताची सत्यप्रत काढून पाहिली. तेव्हा तक्रारदार आणि त्यांच्या मित्राच्या ऐवजी दुसऱ्याच दोन अनोळखी व्यक्तींना रजिस्ट्री कार्यालयात जमीनमालक असल्याचे दाखवून विमलबाई यांनी जमीन खरेदी केल्याचे दिसून आले. 

या खरेदीखतावर संपत राठोड आणि रवींद्र हिवराळे यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्याचे दिसले. विमलबाई आणि साक्षीदार यांच्याकडे जमिनीचे मूळ नोंदणीकृत दस्त नसताना १८ जून २०१४ रोजी  दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी हे नोंदणीकृत दस्त करून दिले. त्यानंतर विमलबाई यांनी ही जमीन गोवर्धन चव्हाण यांना विक्री केल्याचे समोर आल्याने कौशिक यांनी २१ नोव्हेंबर रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीची फिर्याद नोंदविली.
 

Web Title: Made a mutual registry of land by standing fake owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.