मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार एआयएफएफचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:24 AM2019-01-03T00:24:09+5:302019-01-03T00:24:49+5:30
सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (एआयएफएफ)उद्घाटन ९ जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार आहे. आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होऊन एआयएफएफला सुरुवात होईल.
औरंगाबाद : सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (एआयएफएफ)उद्घाटन ९ जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार आहे.
आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होऊन एआयएफएफला सुरुवात होईल. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, ज्युरी कमिटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एन.चंद्रा, चित्रपट निर्माते किरण शांताराम, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. १३ जानेवारीपर्यंत विविध चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील २० महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभाग व देवगिरी महाविद्यालय, ४ रोजी विद्यार्थी कल्याण विभाग, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ व एमआयटी महाविद्यालय. ५ रोजी स.भु. विज्ञान व स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय. ६ रोजी मौलाना आझाद महाविद्यालय व वाय.बी. चव्हाण फार्मसी कॉलेज येथे कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
चौकट
ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक गिरी कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यत्वे कन्नड भाषेतील सिनेमात कार्य केलेले कासारवल्ली यांना आजवर चौदा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे. भारत सरकारने त्यांना २०११ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले आहे.