मोबाईल बॅटरी स्फोटात मदरशातील विद्यार्थी जखमी
By Admin | Published: March 31, 2017 06:53 PM2017-03-31T18:53:06+5:302017-03-31T18:53:06+5:30
मोबाईल बॅटरी चार्जिंग सुरू करून त्यावर गेम खेळणे एका बालकाच्या जिवावर बेतले.
ऑनलाइन लोकमत/बापू सोळुंके
औरंगाबाद, दि. 31 - मोबाईल बॅटरी चार्जिंग सुरू करून त्यावर गेम खेळणे एका बालकाच्या जिवावर बेतले. मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने 12 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मिटमिटा येथील काशीफवाद या मदरशात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)घटनास्थळी धाव घेतली.
मुदस्सीर मुक्तार शेख (12, रा. सादातनगर, पडेगाव)असे जखमी बालकाचे नाव आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुदस्सीर एक वर्षापासून धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मिटमिटा येथील काशीफवाद या मदरशात राहतो. आज शुक्रवारी मदरशाला साप्ताहिक सुटी असते. यामुळे त्याच्यासह अन्य विद्यार्थी दुपारी खेळत होते. काही जण प्रार्थनेसाठी मशिदीकडे गेले होते तर काही विद्यार्थी अभ्यास करीत होते आणि मुदस्सीर मोबाईलवर गेम खेळत होता. साप्ताहिक सुटीमुळे मदरशातील सर्व शिक्षकही तेथे उपस्थित नव्हते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक मुदस्सीरने त्याच्या हातातील मोबाईल बॅटरी चार्जिंगसाठी लावला आणि तो मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात त्याचे तोंड आणि दोन्ही हाताला गंभीर जखमा झाल्या. त्याचे ओठ, नाक आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या स्फोटाच्या आवाजामुळे तेथे खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुदस्सीरकडे पाहिले आणि त्यांनी आरडाओरड केली. यामुळे तेथील शिक्षक तिकडे धावले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत मुदस्सीरला घाटीत दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांसह मदरशाचे संचालक मोईजोद्दीन फारुखी यांनीही घाटीत धाव घेतली. याविषयी अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे म्हणाले की, हा मोबाईल बॅटरीचा स्फोट आहे. आम्ही या घटनेची चौकशी करीत आहोत. छावणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मदरशात मोबाईल वापरण्यास मनाई - मोईजोद्दीन फारुखी
मदरशाचे संचालक मोईजोद्दीन फारूखी यांनी या घटनेविषयी सांगितले की, मदरशात मोबाईल वापरण्यास मनाई आहे. मात्र काही विद्यार्थी चोरून मोबाईल वापरतात आणि मोबाईलवर गेम खेळतात. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास मुदस्सीर मोबाईलवर खेळत होता.यावेळी त्याने मोबाईलची बॅटरी तोंडात पकडल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आम्ही याघटनेची माहिती घेत आहोत.