निकोलस यांच्या जादुई प्रयोगाने औरंगाबादचे रसिक अचंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:24 AM2018-08-12T00:24:32+5:302018-08-12T00:25:29+5:30
जादूचे खेळ हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. जादूगर अलगद हातचलाखी करत जातो आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो, असाच अनुभव गुरुवारी सायंकाळी (दि.९) संत तुकाराम नाट्यगृह येथील कार्यक्रमात आला. जर्मनीहून आलेल्या जादूगर निकोलस फे्रंडरिच यांनी अचंबित करणारे खेळ सादर करून उपस्थितांवर आपल्या जादूची मोहिनी घातली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जादूचे खेळ हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. जादूगर अलगद हातचलाखी करत जातो आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो, असाच अनुभव गुरुवारी सायंकाळी (दि.९) संत तुकाराम नाट्यगृह येथील कार्यक्रमात आला. जर्मनीहून आलेल्या जादूगर निकोलस फे्रंडरिच यांनी अचंबित करणारे खेळ सादर करून उपस्थितांवर आपल्या जादूची मोहिनी घातली.
सांस्कृतिक व कलाक्षेत्रात अग्रणी असलेल्या कलासागर संस्थेतर्फे निकोलस यांचे जादूचे प्रयोग आयोजित केले होते. कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, लोकमतचे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.
व्यासपीठावर येऊन अनोख्या शैलीत स्वत:ची ओळख करून देत निकोलस यांनी उपस्थितांच्या मनाचा ताबा घेतला. ज्याच्यासोबत प्रयोग करणार आहे त्याची देहबोली, सूक्ष्म निरीक्षण, उच्चारातील स्पष्टता आणि हातचलाखी यांचा वापर करून त्यांनी उपस्थिताना प्रभावित केले.
एका प्रयोगादरम्यान त्यांनी बॅगेतून एक दोरी काढली. ती उपस्थितांना दाखविली. नंतर ती दोरी कापून दोन तुकडे केले आणि त्यानंतर ती दोरी पुन्हा जोडून दाखविली. आणखी एका प्रयोगात निकोलस यांनी प्रेक्षकांकडून त्यांच्या स्वाक्षरीसह घेतलेली नोट खिशात ठेवली. त्यानंतर एक सीलबंद डबा प्रेक्षकांपैकी एकाच्या हातात दिला आणि त्यातून ती नोट काढून दाखविली. यासारखे अनेक आश्चर्यकारक प्रयोग सादर करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. लोकांच्या मानसिकतेवर आधारित विविध प्रयोग करून, तसेच क्लृप्त्या करून त्यांनी रसिकांचे पुरेपूर मनोरंजन केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या कलाकृतीचा आनंद लुटला.
प्रत्येक प्रयोगानंतर रसिक आश्चर्य व्यक्त करायचे आणि आता अजून पुढे काय याची डोळे विस्फारून प्रतीक्षा करायचे. यावेळी कलासागरचे अध्यक्ष राजेश भारुका, सचिव विशाल लदनिया, कोषाध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
जगभरात निकोलस यांची ओळख जादुगारपेक्षाही ‘मेन्टालिस्ट’ म्हणजेच मानसिक खेळ करून लोकांचे मनोरंजन करणारा कलाकार अशी आहे. याविषयी सांगताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रयोगासाठी जेव्हा प्रेक्षकांमधून मी कोणालाही इथे बोलावतो, तेव्हा त्याच्या देहबोलीचा, चेहऱ्यावर दिसणाºया हावभावांचा सूक्ष्म अभ्यास करतो. मी काही करायला सांगितल्यावर एक सर्वसामान्य माणूस नेमका कोणता पर्याय निवडेल, याचा मला उत्तम प्रकारे अंदाज आल्यामुळे मी चटकन गोष्टी ओळखू शकतो.