ऐतिहासिक विजयाचे भडकल गेट प्रतीक; हेरिटेज वॉकमध्ये औरंगाबादकरांनी जाणला इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:00 PM2018-01-22T14:00:10+5:302018-01-22T14:01:26+5:30
निजामाचा वजीर मलिक अंबर याने मुघल सुभेदार अब्दुल्लाहवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ ज्याठिकाणी युद्ध जिंकले त्याच ठिकाणी ऐतिहासिक भडकल गेटची उभारणी केली. शहरातील इतर सर्व गेट हे तटबंदीला लागून आहेत; मात्र भडकल गेट हेच एकमेव कॉलमचा आधार घेऊन शहरात बांधण्यात आलेले गेट असल्याची माहिती हेरिटेज वॉकमध्ये इतिहासतज्ज्ञांनी दिली.
औरंगाबाद : निजामाचा वजीर मलिक अंबर याने मुघल सुभेदार अब्दुल्लाहवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ ज्याठिकाणी युद्ध जिंकले त्याच ठिकाणी ऐतिहासिक भडकल गेटची उभारणी केली. शहरातील इतर सर्व गेट हे तटबंदीला लागून आहेत; मात्र भडकल गेट हेच एकमेव कॉलमचा आधार घेऊन शहरात बांधण्यात आलेले गेट असल्याची माहिती हेरिटेज वॉकमध्ये इतिहासतज्ज्ञांनी दिली.
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे भडकल गेट, नवखंडा महाविद्यालय या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या परिसरात हेरिटेज वॉकचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकची सुरुवात भडकल गेट येथून झाली. याठिकाणी इतिहासतज्ज्ञ डॉ. दुल्हारी कुरेशी, रफत कुरेशी आणि केंद्रीय पुरातत्व विभागातील उपाधीक्षक डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनी भडकल गेटीची माहिती इतिहासप्रेमींना दिली. या दरवाजासाठी वापरलेले तंत्रज्ञान हे औरंगाबादमधील इतर दरवाजे व इमारतीसाठी त्याक ाळात वापरलेल्या तंत्रज्ञानापेक्षा वेगळे आहे. हा दरवाजा १६११ मध्ये बांधण्यात आला.
ऊर्ध्वलंब फासळ्यांनी बनवलेले छत ही पद्धत भडकल दरवाजात प्रथमच वापरण्यात आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यानंतर भडकल गेटच्या समोर असलेल्या छोटा भडकल गेट इतिहासप्रेमींनी पाहिला. तेथून नौखंडा महल पाहण्यासाठी इतिहासप्रेमी गेले. नौखंडा महलसुद्धा मलिक अंबरनेच १६१६ मध्ये अहमदनगर येथील मुर्तुजा निजामशहा दुसरा यांच्यासाठी उभारला. या महलाचा औरंगजेब व पहिला निजामशहा असीफजहांच्या काळात अधिक विकास झाला. औरंगजेबाच्या काळात सुभेदार आलम अली खान याने या महालात मोठ्या प्रमाणात बदल करीत भर घातली. या महलाच्या परिसरातील हिरवाईने नटलेला बागेचा परिसर आणि त्यात भर घालणारे हौदातील कारंजे या सर्वच गोष्टी आता नामशेष झाल्या आहेत. या परिसरातील सर्व बागांना त्या काळात नहर-ए-अंबरीतूनच पाणीपुरवठा होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. याच परिसरात असलेल्या बारादरी, मशिदीची पाहणी केल्यानंतर हेरिटेज वॉकचा समारोप झाला. या हेरिटेज वॉकमध्ये संयोजक डॉ. बीना सेंगर, वास्तुविशारद प्रदीप देशपांडे, अॅड. स्वप्नील जोशी, डॉ. कामाजी डक, उषा पाठक, लतीफ शेख, उमेश डोंगरे, किरण वानगुजार, मयूर शर्मा, फय्याज खान, प्रभाकर शिंदे आदींसह इतिहासप्रेमी हजर होते.