मागोवा २०१७ : औरंगाबादसाठी ऐतिहासिक स्मारकांच्या दुर्दशेचे वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 04:21 PM2017-12-29T16:21:22+5:302017-12-29T16:21:45+5:30
शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकांच्या अस्तित्वावर शहर प्रशासनाने घातलेला घाला आणि नाट्यगृहांची दुरवस्था या दोन गोष्टींमुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवाला मोठा बट्टा लागला. सदरील वृत्तात या संपूर्ण वर्षाचा घेतलेला हा आढावा.
- मयूर देवकर
औरंगाबाद : देदीप्यमान इतिहासाची परंपरा लाभलेल्या या औरंगाबादनगरीसाठी २०१७ हे वर्ष कलासंस्कृतीच्या दृष्टिकोनातून फारसे उत्साहवर्धक ठरले नाही. शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकांच्या अस्तित्वावर शहर प्रशासनाने घातलेला घाला आणि नाट्यगृहांची दुरवस्था या दोन गोष्टींमुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवाला मोठा बट्टा लागला. सदरील वृत्तात या संपूर्ण वर्षाचा घेतलेला हा आढावा...
वारसा संवर्धन समिती गठित
-एप्रिल महिन्यात रातोरात खासगेट पाडल्यानंतर मनपाविरोधात कँडल मार्च काढण्यात आला.
-विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी इतिहासप्रेमी, स्थापत्यकार, अभियंते, पुरातत्व अभ्यासक, पर्यटनप्रेमी आणि नागरिक यांच्या समन्वयासाठी ‘औरंगाबाद वारसा संवर्धन समिती’ गठित केली आहे.
-औरंगाबाद हिस्टॉरिकल सोसायटीच्या पुढाकाराने मे महिन्यात ‘हेरिटेज वॉक’ सुरू करण्यात आले. आजतागायत असे अकरा वॉक घेण्यात आले.
- यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कायमस्वरूपी रेखाचित्र दालन सुरू करण्यात आले.
- अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे विभागीय कार्यालय औरंगाबाद शहरात सुरू झाले.
नाट्यगृहांची दुरवस्था
- आॅगस्ट महिन्यात अभिनेता सुमित राघवन याने थेट फेसबुकवरच संत एकनाथ रंगभूमीच्या दुरवस्थेचे दर्शन घडविले. त्यानंतर खडाडून जागे झालेल्या लोकप्रतिनिधींनी कोट्यवधींच्या घोषणांचा पाऊस पाडला.
- खा. चंद्रकांत खैरे यांनी दोन कोटी, मनपाचे ५० लाख, आ. संजय शिरसाट यांनी २० लाखांची घोषणा.
- मनपाच्या ताब्यातील संत एकनाथ रंगमंदिर, संत तुकाराम नाट्यगृह, नेहरू भवन आणि मौलाना आझाद संशोधन केंद्र यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
- ‘नावासाठी नाही तर गावासाठी’ या उपक्रमांतर्गत शहरातील नाट्यप्रेमींनी नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला.
रंगभूमी
- मराठवाड्यातील कलावंत घेऊन अरविंद जगताप यांचे ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ आणि शैलेश कोरडे यांचे ‘एक परी’ ही दोन नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली.
- युवा नाटककार सुमीत तौर (बाजीराव नस्तानी) आणि प्रवीण पाटेकर (अखंड) यांनी ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला.
- विभागीय कामगार बालनाट्य स्पर्धेत अभय कुलकर्णी दिग्दर्शित ‘आणि तो मला भेटला’ या बालनाट्याने प्रथम क्रमांक मिळवला.
- प्रवीण पाटेकरची ‘मॅट्रिक’ ही एकांकिका गाडगीळ एकांकिका स्पर्धेत सांघिक गटात प्रथम आली.
- तसेच विद्यापीठामध्ये मार्च महिन्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे अभिजात संगीत नाटकांचा महोत्सवही घेण्यात आला.
- प्रसिद्ध नाटककार प्रा. रुस्तुम अचलखांब यांचे आॅक्टोबर महिन्यात निधन झाले.
संगीत आणि नृत्य
- शहरामध्ये महेश काळे, राहुल देशपांडे, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, पं. रामदास पळसुले, कल्याण अपार, हृदयनाथ मंगेशकर, मकरंद देशपांडे, डॉ. पं. अजय पोहनकर, अभिजित पोहनकर नामावंत गायक, कवी, वादकांचा कलाविष्कार सादर झाला.
- गंधर्व संगीत महोत्सव असेल किंवा दिवाळी/पाडवा पहाट असेल, येनकेनप्रकारेण निमित्ताने शहरात संगीत कार्यक्रम झाले.
- महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित नृत्यप्रस्तुती विशेष ठरली.
साहित्य संमेलने :
- संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे झेप साहित्य संमेलन.
- बालाजी मदन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन
- प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली दहावे गुणिजन साहित्य संमेलन.
- वरद गणेश वाचनालयातर्फे ‘बालसाहित्य संमेलन’. अध्यक्षस्थानी ल. म. कडू होते.
- ‘उत्सवी’ संमेलन घेण्यास विरोध करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली.
साहित्य पुरस्कार
शहरातील बबु्रवान रुद्रकंठवार, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि सुरेश चौथाईवाले यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दिले जाणारे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले.