औशात शेतकरी, शेतमजुरासह निराधारांचा महाआक्रोश मोर्चा
By संदीप शिंदे | Published: January 15, 2024 06:21 PM2024-01-15T18:21:57+5:302024-01-15T18:56:59+5:30
सोयाबीनला ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा देण्याची मागणी
औसा : मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी औसा तहसील कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ऊसाला भाव का मिळत नाही, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सोयाबीनला प्रतिक्विंटल ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा, निराधारांना ३ हजार मानधन मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
औसा तालुक्यात १५ दिवस १०० गावातून १५० कि.मी. पायीदिंडी काढून शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या मागण्याची जनजागृती करण्यात आली. किल्ला मैदान ते औसा तहसील कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कांदा निर्यात बंदी उठवा, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान द्याओ, चालू बाकी करणाऱ्यांसाठी व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, राजू कसबे, शामभाऊ जाधव आदींसह शेतकरी, शेतमजूर, आणि निराधार उपस्थित होते.
१९ जानेवारीला रेल्वे अडवणार...
आम्ही आमचा हक्क व अधिकार मागतोय, सोयाबीनचा एकरी ३५ हजार खर्च अन् उत्पन्न १५ हजार. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने सोयाबीनला ४५०० भाव मिळतो. १८ जानेवारीपर्यंत वरील मागण्या मान्य न झाल्यास १९ जानेवारीला मुंबई, गुजरातला रेल्वे जाणार नाहीत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीवही गेला तरीही चालेल, पण शेतकरी, शेतमजूर, निराधारांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले.