बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची मूक निदर्शने
By बापू सोळुंके | Published: August 24, 2024 01:33 PM2024-08-24T13:33:52+5:302024-08-24T13:34:19+5:30
महायुतीचे काळे कारनामे लिहिलेली काळे बलून आंदोलकांनी फोडले
छत्रपती संभाजीनगर: बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी क्रांतीचौकात दिडतास मूक निदर्शने करण्यात आली. तोंडाला काळ्या पट्ट्या लावून आणि काळे कपडे घालून सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचे काळे कारनामे, स्त्री रक्षणाची आस धरा, नाहीतर खुर्ची खाली करा, नराधमांना फाशी देणारा कायदा करा, अशा घोषणांचे फलक हातात घेत सरकारचे लक्ष वेधले.
बदलापुर येथील दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतच तेथील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. तेव्हापासून या घटनेबद्दल जनसामान्य संताप व्यक्त करीत आहेत. या घटनेनंतर शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेबद्दल सर्वस्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर पिडितांना न्याय मिळाला हवा, यासाठी आरोपीवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. मात्र न्यायालयाने बंद करण्यास मनाई आदेश दिले. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी राज्यभर मूक निदर्शने आयोजित केली होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात ही निदर्शने झाली. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रत्येक आंदोलकांनी तोंडाला काळी पट्टी बांधली होती आणि काळे कपडे परिधान केले होते.
यासोबतच महायुतीचे काळे कारनामे लिहिलेली काळे बलून आणले होते. आंदोलकांच्या हातातील फलकावर महिलावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आणि पाठीशी घत्तलणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, स्त्री रक्षणाची आस धरा, नाहीतर खुर्ची खाली करा, माय भगिनींना शब्दाचा वायदा नको, नराधमांना फाशी देणारा कायदा हवा, अशी मागणी या फलकातून करण्यात आली होती.
या आंदोलनात शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य,माजी महापौर, नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,दिग्विजय शेरखाने, संतोष खेंडके, ज्ञानेश्वर डांगे, हनुमान शिंदे, बाळासाहेब गायकवाड, विजय वाघचौरे, सुनीता देव, सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दीपा मिसाळ, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, डॉ. जफर खान, योगेश मसलगे, डॉ. पवन डोंगरे, कल्याण कावरे, रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, विठ्ठल जाधव, राजेंद्र पवार, आदींनी सहभाग नोंदविला.
आंदोलनानंतर शिवरायांच्या पुतळ्याला प्रदर्क्षिणा
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रदर्क्षिणा घालून आंदोलनाचा समारोप केला. शांततेत आणि शिस्तबद्धपणे हे आंदोलन केले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोेधातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलनाच्यानिमित्ताने क्रांतीचौकात आमने,सामने येऊ शकतात.ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी चेाख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सुनील माने , अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच एसआरपीची एक तुकडीच तेथे तैनात होती.