Ganesh Mahotsav: औरंगाबादेत पुन्हा महागणपतीचा क्रेझ; ११ ते १७ फूट उंचीच्या ७ गणेशमूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 07:04 PM2022-09-03T19:04:39+5:302022-09-03T19:05:42+5:30

मुंबईच्या ‘लालबागचा राजा’च्या धर्तीवर शहरातही मोठ्या मूर्ती आणण्यात आल्या आहेत.

Mahaganpati craze again in Aurangabad during Ganeshotsav; 7 Ganesha idols of 11 to 17 feet height | Ganesh Mahotsav: औरंगाबादेत पुन्हा महागणपतीचा क्रेझ; ११ ते १७ फूट उंचीच्या ७ गणेशमूर्ती

Ganesh Mahotsav: औरंगाबादेत पुन्हा महागणपतीचा क्रेझ; ११ ते १७ फूट उंचीच्या ७ गणेशमूर्ती

googlenewsNext

औरंगाबाद : आमच्या मंडळाची गणेशमूर्ती सर्वात उंच असावी, महाकाय गणेशमूर्ती बसविण्याचा मान आपल्याच मंडळाला मिळावा, अशी स्पर्धाच शहरातील गणेश मंडळामध्ये पुन्हा निर्माण झाली आहे. यातूनच शहरात ७ महाकाय गणेशमूर्तीची यंदा स्थापना झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, यातील चार मूर्ती मुंबईतील, १ मूर्ती पुण्यातील व २ मूर्ती औरंगाबादेतील मूर्तिकारांनी घडविल्या आहेत.

‘भाई आपुन के मोहल्ले का गणपती सबसे बडा नंबर वन दिखना चाहिए,’ असे म्हणत सार्वजनिक गणेश मंडळांनी उंच मूर्तीचा विषय प्रतिष्ठेचा करून घेतला आहे. मुंबईच्या ‘लालबागचा राजा’च्या धर्तीवर शहरातही मोठ्या मूर्ती आणण्यात आल्या आहेत. या मोठ्या मूर्तीबद्दल शहरवासीयांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

जागृत हनुमान गणेश मंडळ
पानदरीबा रोडवरील जागृत हनुमान गणेश मंडळाची मूर्ती तब्बल १७ फूट उंचीची आहे. ही मूर्ती फायबरमध्ये बनविण्यात आली. खास पुणे येथील कसबा गणपतीची प्रतिकृती बनविणाऱ्या मूर्तिकारानेही ही मूर्ती २०१७ मध्ये बनविली होती. सिंहासनाधीश मूर्ती गणेशोत्सवानंतर महादेवाच्या मंदिरात ठेवण्यात येते.

हडकोचा राजा
हडको स्वामी विवेकानंदनगरात मोरया सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा ‘हडकोचा राजा’ पाहण्यासाठी भक्त गर्दी करत आहेत. ही पीओपीची १६ फूट उंचीची मूर्ती यंदा मुंबईहून आणण्यात आली आहे. ही मूर्ती चिंचपोकळीचा राजासारखी दिसते.

देवडीचा राजा
राजाबाजार ते नवाबपुरा रस्त्यावर देवडीचा राजा गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती १५ फूट उंचीची आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सर्वात आधी याच मूर्तीची आगमनाची मिरवणूक निघाली होती.

महाकाय प्रतिष्ठान
नागेश्वरवाडीतील महाकाय प्रतिष्ठानची मूर्ती १३ फुटांची आहे. शहरातील मूर्तिकार गणेश बगले यांनी मूर्ती बनविली. आगमनाची मिरवणूक जोरदार निघाली होती. या मोठ्या मूर्तीच्या मागे विठ्ठल भगवंतांचा कट आउट लावण्यात आला आहे.

मुद्रा गणेश मंडळ
सिडको बळीराम पाटील हायस्कूल रस्त्यावरील एन ८, राजे छत्रपती चाैकातील विघ्नहर्ता सिडकोचा मुद्रा गणेश मंडळाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. सिंहासनावर विराजमान झालेली मागील एका हातात परशू व दुसऱ्या हातात त्रिशूल घेतलेली व एका हाताने आशीर्वाद देणारी मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. ही १४ फुटांची मूर्ती मुंबईहून आणण्यात आली आहे.

श्री स्वामी गणेश मंडळ
सिडको एन ८ येथील श्री स्वामी गणेश मंडळाची ‘मार्तंड’ रूपातील १३ फूट उंचीची गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महादेवाच्या मल्हार अवतारातील सिंहासनधीश गणेश रूपात तयार केली आहे.

धावणी मोहल्ला
धावणी मोहल्लातील बालकन्हैया गणेश मंडळाची ११ फूट उंचीची मूर्ती आहे. बालरूपातीलही मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मागील ११ वर्षांपासून ही मूर्ती गणेशोत्सवात स्थापन केल्या जाते. याच बालकन्हैया गणेशमूर्तीपासून पुन्हा एकदा मोठ्या मूर्तीची क्रेझ शहरात निर्माण झाली.

तीन महाकाय श्री मूर्तीचे मंदिर
स्व.मूर्तिकार रतनलाल बगले यांनी शहरात ३ महाकाय मूर्ती घडविल्या. त्यात कुंवारफल्लीतील गणेशमूर्ती, चौराहातील गणेशमूर्ती व दिवाण देवडीतील गणेशमूर्ती अनुक्रमे १३, १९ व १७ फुटांच्या आहेत. २०व्या शतकाच्या अखेरीस या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. या प्रत्येक मूर्ती स्थापनेचा एक इतिहास आहे. या मूर्ती पीओपीतील असून, ज्या ठिकाणी स्थापना झाली, त्याच ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आहे.

Web Title: Mahaganpati craze again in Aurangabad during Ganeshotsav; 7 Ganesha idols of 11 to 17 feet height

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.