‘महाज्योती’ संशोधकांनाही ‘सारथी-बार्टी’प्रमाणेच भत्ते; सर्वांना फेलोशिपचा निर्णय अर्थ विभागावर

By योगेश पायघन | Published: September 26, 2022 08:05 PM2022-09-26T20:05:30+5:302022-09-26T20:05:58+5:30

संशोधक विद्यार्थ्यांनी नागपूर, औरंगाबादेत आंदोलन करून मागण्यांकडे वेधले होते लक्ष 

'Mahajyoti' researchers also get the same allowances as 'Sarathi-Barti'; decision of fellowship for all depends on finance department | ‘महाज्योती’ संशोधकांनाही ‘सारथी-बार्टी’प्रमाणेच भत्ते; सर्वांना फेलोशिपचा निर्णय अर्थ विभागावर

‘महाज्योती’ संशोधकांनाही ‘सारथी-बार्टी’प्रमाणेच भत्ते; सर्वांना फेलोशिपचा निर्णय अर्थ विभागावर

googlenewsNext

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेंतर्गत (महाज्योती) असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना ‘सारथी’ आणि ‘बार्टी‘प्रमाणेच भत्ते देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी नागपूर येथे मुख्य कार्यालयात; तसेच औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत ‘सारथी’, ‘बार्टी’ प्रमाणे घरभाडे भत्ता (एचआरए) आणि आकस्मिक भत्ते देण्याचा निर्णय झाला, मात्र सरसकट फेलोशिपच्या देण्याच्या मागणीवर अर्थ खात्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक नागपूर येथे महाज्योतीच्या कार्यालयात मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना नोंदणी दिनांकापासून पहिल्या २ वर्षांसाठी ३१ हजार तर, पुढील ३ वर्षांसाठी ३५ हजार रुपयांसह ‘एचआरए’ आणि आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘एमफिल’ उमेदवारांना एमफिल. ते पीएचडी असे ‘इंटेग्रेटेड’ देण्याबाबत ‘बार्टी’च्या धर्तीवर तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. एमफिल उमेदवारांना ३१ हजारांसह ‘एचआरए’ आणि आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दिल्ली येथे ‘यूपीएससी’ प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन १३ हजार रुपये व १८ रुपये आकस्मिक एकवेळ खर्च, ‘एमपीएससी’ मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलाखतीस पात्र उमेदवारांना २५ हजार एकवेळ अर्थसहाय्य; तसेच व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना १० हजार रुपये प्रतीमहिना विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे, संचालक सिद्धार्थ गायकवाड, मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाट यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी घेतली मंत्री सावेंची भेट
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे राज्य अध्यक्ष बळिराम चव्हाण, विठ्ठल नागरे, विजय धनगर, आशिष लहासे, विद्यानंद वाघ, अभिषेक राऊत, सतीश पालवे, सोमनाथ चौरे, हनुमान रासवे, महेंद्र मुंडे आदींसह विद्यार्थ्यांनी नागपूर येथे मंत्री सावे यांची भेट घेत मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यावर मंत्री सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

औरंगाबादेत ठिय्या आंदोलन
महाज्योतीच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप द्यावी. ‘बार्टी’, ‘सारथी’प्रमाणे ‘एचआरए’ आणि आकस्मिक भत्ते द्यावे. विभागीय कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यरत करावे, अशी मागणी ठिय्या आंदोलनाद्वारे केली. अशोक जायभाये, देवानंद नागरे, रामप्रसाद सोनपीर, राम हुसे, सागर राठोड, स्वप्निल चंदने, मनिषा शिंदे, धनश्री जायभाये, कल्पना बडे आदींसह संशोधक विद्यार्थ्यांनी पोलीस बंदोबस्तात समाजकल्याण उपायुक्त व महाज्योती विभागीय कार्यालयात मागण्याचे निवेदन दिले.

निर्णय अर्थ विभागाच्या मान्यतेनंतर
महाज्योतीकडून पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप तसेच एचआरए आणि आकस्मिक भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. संशोधन फेलोशिपसाठी यावर्षी खुप अर्ज आले आहेत. त्या १५०० अर्जांना शासनाला किती खर्च लागेल त्याचा हिशेब करत आहोत. खर्चाची रक्कम मोठी असेल त्यासाठी अर्थ विभागाकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. पुढच्या २-४ दिवसांत त्यासंबंधी निर्णय घेवू.
-अतुल सावे, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री

Web Title: 'Mahajyoti' researchers also get the same allowances as 'Sarathi-Barti'; decision of fellowship for all depends on finance department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.