इच्छित फळले मनामनांचे...पारणे फिटले नयनांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:31 AM2017-11-05T01:31:58+5:302017-11-05T01:34:38+5:30

कचनेरनगरीला जणू पंढरीचे स्वरुप आले होते. निमित्त होते १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथील वार्षिक यात्रा महामहोत्सवाचे.

Mahamastakabhishek festival at Kachner | इच्छित फळले मनामनांचे...पारणे फिटले नयनांचे

इच्छित फळले मनामनांचे...पारणे फिटले नयनांचे

googlenewsNext

उदयकुमार जैन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशभरातून आलेल्या लाखो भाविकांमुळे शनिवारी कचनेरच्या वाटांमध्ये मुंगीला शिरायलाही जागा शिल्लक नव्हती. यात पायी येणा-या यात्रेकरुंची संख्या लक्षणीय होती. कचनेरनगरीला जणू पंढरीचे स्वरुप आले होते. निमित्त होते १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथील वार्षिक यात्रा महामहोत्सवाचे.
३ नोव्हेंबर रोजी या तीन दिवसीय यात्रोत्सवास प्रारंभ झाल्यानंतर दुस-या दिवशी (शनिवारी) मूलनायक श्री चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा मुख्य महामस्तकाभिषेक सोहळा लाखो भाविकांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. यावेळी प.पू. दिगंबर जैनाचार्य १०८ गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघ, मुनीश्री प्रबलसागरजी महाराज ससंघ, प. पू. मुनीश्री विप्रणतसागरजी महाराज, प.पू. आर्यिका गुरष्ठनंदनी माताजी ससंघ, प.पू. आर्यिका कुलभूषणमती माताजी ससंघ विराजमान होते. गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचे प्रवचन झाले. त्यांनी कचनेर क्षेत्राची महती सांगून कचनेर गुरुकुलच्या कार्याची प्रशंसा केली व जवळच निर्माण होत असलेल्या जैन धर्मतीर्थाची माहिती दिली.
सकाळी ११ वाजता बोलियाचा कार्यक्रम संपल्यानंतर प.पू. आचार्य गुप्तनंदीजी गुरुदेव यांच्या अमृतवाणीतील मंत्रोच्चाराने पांडुकशिलेवर विराजमान चिंतामणी बाबांच्या पंचामृत महामस्तकाभिषेक सोहळ्यास औरंगाबाद येथील णमोकार भक्तिमंडळाच्या सुमधुर संगीतमय साथीने प्रारंभ झाला. यावेळी लाखो भाविकांच्या नजरा पांडुकशिलेवर खिळल्या होत्या. हॉल गच्च भरला होता, तरीही भाविक मिळेल तेथे उभे राहून हा क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करताना दिसले. मंदिर परिसरात क्लोज सर्किट टीव्हीद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविले जात होते, त्यामुळे हजारो भाविकांनी टीव्हीसमोर बसून महामस्तकाभिषेक बघितला. महामस्तकाभिषेक सुरु असताना आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव भाविकांचा उत्साह वाढवत होते. त्यामुळे परिसरात भक्तिभावाचे मंगलमय सूर ऐकू येत होते. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले.
आलेल्या सर्व भाविकांचे क्षेत्रातर्फे स्वागत केले जात होते. भंडारादाते, दानशूर व आलेल्या मान्यवरांचा यावेळी क्षेत्र पदाधिकाºयांनी सत्कार केला. एवढ्या भक्तांच्या जेवणासाठी भव्य मंडप टाकण्यात आला होता. अत्यंत शिस्तीने सर्व जण महाप्रसाद घेताना दिसले.
कार्यक्रमासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी.यू. जैन, उपाध्यक्ष माणिकचंद गंगवाल, व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, कार्यकारिणी अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, कार्यकारिणी महामंत्री भरत ठोळे, ललित पाटणी, केशरीनाथ जैन, प्रकाश गंगवाल, विनोद लोहाडे, प्राचार्य किरण मास्ट, व्यवस्थापक स्वप्नील जैन आदींसह क्षेत्राचे सर्व विश्वस्त, कार्यकारिणी मंडळ, यात्रा समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारी, पोलीस व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Mahamastakabhishek festival at Kachner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.