"...तर काँग्रेसच्या हातात रिमोट कसा जाऊ देईन"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:45 PM2024-11-15T18:45:12+5:302024-11-15T19:00:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी वैजापूरमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashta Assembly Election 2024 : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसकडून आणि राहुल गांधींकडून बाळासाहेबांचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला असल्याचेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
गुरुवारी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. राहुल गांधींनी तोंडातून एकदा तरी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलून दाखवावं. एवढं जरी केलं तरी उद्धव ठाकरेंना चांगली झोप लागेल, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. वैजापूरमध्ये बोलताना आता उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे.
"कलम ३७० काढायला विरोध करणाऱ्यांच्या सोबत उद्धव ठाकरे गेल्याचा तुम्ही आव आणत आहात. काश्मीरमध्ये तुम्ही मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत बसला होतात तेव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व. पंतप्रधान मोदीजी माझा रिमोट कोणाच्या हातात आहे हे पाहायचा प्रयत्न करू नका. मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. तुमच्या हातात माझा रिमोट राहू शकला नाही तर बाकीच्यांच्या हातात काय राहणार. जर मोदींच्या हातात मी माझ्या शिवसेनेचा रिमोट जाऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातात कसं काय जाऊ देईन मी. पण तुम्ही नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खायला का गेला होतात याचे उत्तर आम्हाला द्या. तुम्ही आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व शिकवता," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
"मुंबई ही बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचे शहर आहे. मुंबई हे स्वाभिमानाचे शहर आहे पण महाविकास आघाडीमध्ये एक असा पक्ष आहे ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. त्यामुळे मी यांना आव्हान दिलं होतं की काँग्रेसच्या तोंडातून राहुल गांधींच्या तोंडातून बाळासाहेबांचे कौतुक करणारे काही शब्द बोलून दाखवावे. राहुल गांधींनी तोंडातून एकदा तरी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलून दाखवावं. एवढं जरी केलं तरी तुम्हाला चांगली झोप लागेल दवाखान्यात जाण्याची गरज लागणार नाही बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील आजपर्यंत हे लोक काँग्रेसकडून राहुल गांधींकडून बाळासाहेबांचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.