भाजपकडून पंचाहत्तरीतील हरिभाऊ बागडे यांनाच पुनश्च संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:42 PM2019-10-01T16:42:30+5:302019-10-01T16:46:34+5:30
७५ वर्षावरून लोकसभेत 'अध्यक्षांना' तर विधानसभेत 'नियमाला' डावलले
औरंगाबाद : भाजपने लोकसभा निवडणुकीत ७५ पेक्षा अधिक वय झालेल्या व्यक्तींना उमेदवारी नाकारली होती. यात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचाही समावेश होता. मात्र महाराष्ट्रात फुलंब्री विधानसभेसाठी पक्षाने पंचाहत्तरीत प्रवेश केलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपने ७५ पेक्षा अधिक वय झालेल्या व्यक्तींना उमेदवारी नाकारण्यात आली होती. याची पुनरावृत्ती राज्य विधानसभा निवडणुकीत केली जाणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ७५ मध्ये असलेले विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी कापण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र कॉंग्रेसच्या कल्याण काळे या तगड्या उमेदवाराविरोधात भाजपने हरिभाऊ बागडे यांनाच पुन्हा संधी दिली आहे.
सोमवारी बागडे यांनी भारतीय जनता पक्ष ज्या घटनेच्या आधारावर चालतो. त्यामध्ये कोठेही ७५ वय झालेल्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी नोंद करण्यात आलेली नाही. जो मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. जनतेची सेवा करू शकतो. त्यांना उमेदवारी देण्यात येते असा विश्वास व्यक्त केला होता. यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा दावा खोटा ठरला असून भाजपने लोकसभेत 'अध्यक्षांना' तर विधानसभेत 'नियमाला' डावलले असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.
हा दावाच चुकीचा
७५ वर्षे वय झाल्यानंतर उमेदवारी नाही, हा दावाच चुकीचा असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले. उलट वयापेक्षा जो व्यक्ती मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. जनतेची कामे करू शकतो, अशा व्यक्तींना उमेदवारी पक्ष नाकारू शकत नाही, असे सांगितले.