संजय शिरसाठांना सेनेचा 'एबी फॉर्म'; भाजपचे राजू शिंदे अद्यापही रणांगणात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 04:58 PM2019-09-30T16:58:21+5:302019-09-30T17:16:32+5:30
मागील दोन दिवसांपासून शिंदे मुंबईत तळ ठोकून आहेत.
औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेनेने विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपचे नगरसेवक राजू शिंदे निवडणूक रिंगणात कायम आहेत. मतदारसंघातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील दोन दिवसांपासून शिंदे मुंबईत तळ ठोकून आहेत.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांनी आपला दावा आधीच ठोकला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून आमदार संजय शिरसाठ यांनाच औरंगाबाद पश्चिममधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना पक्षाने एबी फॉर्मसुद्धा दिला आहे. मात्र या मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतलेल्या भाजपच्या राजू शिंदे यांची अद्याप माघार घेतली नाही. आ. शिरसाठ यांच्या उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच शिंदे यांनी मतदारसंघात मोठे कार्यालय थाटून शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्यास सुरुवात केली होती. तसेच औरंगाबाद पश्चिमची निवडणूक ही यंदा मतदारसंघातील न सुटलेल्या प्रश्नांवर होणार आहे. हीच बाब हेरून शिंदे यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आणि आ. शिरसाट यांच्यापुढे तेच प्रबळ उमेदवार असल्याचे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. यामुळेच शिरसाठ यांची उमेदवारी जाहीर झालेलीं असतानी त्यांचे आव्हान अद्याप कायम आहे. मात्र पक्षाने त्यांना निवडणूक लढविण्यास संदर्भात ग्रीन सिग्नल दिला नाही.
२०१४ मध्ये भाजपा उमेदवार दुसऱ्या स्थानी
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. त्यावेळी भाजपचे मधुकर सावंत यांनी आ. शिरसाट यांना जोरदार लढत दिली. सावंत यांची तयारी नसताना त्यांना पक्षाने तिकीट दिले आणि त्यांनी ५४ हजार ३५५ इतकी मते घेतली. आ. शिरसाट यांना त्यावेळी ६१ हजार २८२ मते मिळाली. या निवडणुकीच्या काही दिवसांनंतरच राजू शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले.
काँग्रेसमध्ये काय?
२०१४ मध्ये जितेंद्र देहाडे हे काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. त्यामुळे या मतदारसंघात वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसची ताकद कमी आहे. त्यामुळे ही जागा अन्य पक्षाला देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत निश्चित अशी माहिती समोर येत नाही.